पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१०६

हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड] वेदान्त व हक्क. १०१

करण्याकरितां खटपट केली पाहिजे. सामान्य लोकांपेक्षा चार अक्षरे आपणास अधिक येतात आणि त्यांच्याहून अधिक सुंदर भाषा आपणास बोलतां येते इतक्यानेच तुम्ही स्वतःस त्यांच्याहून श्रेष्ठ समजत असता; पण अशा भलत्याच भ्रमांत जोवर तुम्ही स्वतःस बांधून घेतले असेल तोवर मुक्तिमार्गाकडे एक पाऊलभरही तुम्ही पुढे टाकलेले नाही हे पक्के लक्ष्यात ठेवा. हा मार्ग मुक्तीचा नाही, इतकेच नव्हे तर यामुळे तुमच्या पायांतील शृंखलेला एक एक नवा दुवा तुम्ही रोज जोडीत असतां; आणि अशांतच ' मी साधु, मी ब्रह्मनिष्ठ ' या श्रमानें जर तुमच्या चित्तास पछाडले, तर मग ईश्वरच तुमचे रक्षण करो. मग त्या दुर्गतीपंकांतून तुम्हांस बाहेर ओढण्याचे सामर्थ्य या भुवनत्रयांत कोणाच्याही अंगी नाही. ' मी साधु ' या पाशापुढे नागपाश आणि कालपाश हे क:पदार्थ होत. पैशाचा मोठेपणा अथवा दुसऱ्या कसल्या गोष्टीने आलेला मोठेपणा हा जीवात्म्यास इतक्या पक्क्या रीतीने बांधीत नाही; पण ' मी साधु ' या पाशाचा प्रभाव अतर्क्य-अलक्ष्य आहे. मनुष्याच्या मनात घर करण्याकरितां टपून बसलेल्या पिशाचसंघांत हा ब्रह्मसमंध आहे. याचें बिऱ्हाड एकदां आले की त्याला गाडणारा पंचाक्षरी तुम्हांस कोठेही भेटावयाचा नाही. तुम्ही स्वतःस ज्या गुणाने अधिक पवित्र समजत असतो तो गुण कोणचा ? तुमच्या ठिकाणी असलेल्या ईश्वरत्वाचा. हे ईश्वरत्व इतर ठिकाणीही आहे; आणि स्वतःच्या ठिकाणचे ईश्वरत्वच सर्वत्र भरलें आहे हे तुम्हांस कळले नसेल, तर ज्ञानाचा ओनामाही तुम्हांस ठाऊक नाही. अशा स्थितीत स्वतःस तुम्ही ज्ञानी समजत असाल, तर तुम्ही अज्ञाहून अज्ञ इतकें मात्र खरें. “ सर्वं खल्विदं ब्रह्म' मग यांत उच्चनीचता आली कोठून ? - " रामसभामें हरिजन बैठे को बडा को छोटा है " परमात्म्याच्या देवळाच्या सभामंडपांतच सर्व विश्व बसले आहे. हे ज्ञान तुम्हांस झाले असेल तर

ठीकच आहे, आणि तसे नसेल तर ईश्वराची भेट होण्यास अद्यापि बरेच कल्प तुम्हांस वाट पाहावी लागणार हे उघड आहे.