पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१०७

हे पान प्रमाणित केलेले आहे.

१०२ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम

हक्क

 या साऱ्या सृष्टीच्या घडामोडीचे अवलोकन केले तर त्यात दोन प्रकारच्या शक्तींची कार्ये सुरू आहेत असे आढळून येते. यांतील एक शक्ति सदोदित विघटनेचे कार्य करीत असते. संयुक्त पदार्थातील घटक एकमेकांपासून विभक्त करावयाचे हे तिचे कार्य आहे; आणि दुसरी शक्ति एकीकरणाची क्रिया करीत असते. सृष्टीतील वेगवेगळे पदार्थ एकत्र आणून त्यांचा संयोग करावयाचा हे या दुसऱ्या प्रकारच्या शक्तीचे कार्य आहे. पहिल्या प्रकारच्या शक्तीमुळे व्यक्ती निर्माण होत असतात; आणि दुसरी शक्ति, जणू काय, या साऱ्या व्यक्तींची अथवा व्यष्टींची गांठ बांधून त्यांना समष्टिरूप करावें व त्यांच्यांत एकतानता आणावी यासाठी धडपडत असते. अशा रीतीने विभक्ततेचा प्रत्यय सर्वत्र येत असतांही तिच्याच पोटी एकतानतेची धडपडही चालू आहे. या दोन्ही शक्तींचे कार्य सृष्टीच्या सर्व भागांत आणि मनुष्याच्या जीवनांतही चालू असल्याचा प्रत्यय येतो. केवळ जड अथवा पदार्थसृष्टीकडे पाहिले तरी तीत या दोन्ही शक्तींचे कार्य अगदी स्पष्ट स्वरूपाने दिसते. एका पक्षी पहिल्या शक्तीच्या कार्यामुळे व्यक्ति व्यक्तीपासून भिन्न होत असते. दोन व्यक्तींत प्रत्येकी विशिष्ट गुणदोषांची वाढ होऊन त्या व्यक्ती परस्परांपासून अधिकाधिक दूर होत असतात; आणि दुसऱ्या पक्षी दुसऱ्या प्रकारच्या शक्तीच्या कार्यामुळे अनेक व्यक्तींत गुणदोषांचे साधर्म्य उत्पन्न होऊन त्यांची एक जाति बनत असते. एका जातींत समसमान गुणांच्या अनेक व्यक्ती एकत्र बांधल्या जातात आणि यामुळे त्यांच्यांत एकतानता उत्पन्न होत असते. एका जातींत बाह्य आकाराने व अंतर्गत गुणांनी एकमेकांशी जुळणाऱ्या अनेक व्यक्तींचा समावेश होतो. हाच नियम मनुष्यप्राण्याच्या सामाजिक जीवनालाही लागू आहे. मनुष्य समाजरूपाने राहूं लागला तेव्हांपासून त्या समाजांत घटना आणि विघटना या दोन शक्तींचें कार्य सतत सुरू राहिले आहे. या दोन क्रियांची रूपें देश, काल आणि परिस्थिति यांस अनुसरून वेगवेगळ्या प्रकारची होतात आणि तदनुरूप भिन्न