पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१३१

हे पान प्रमाणित केलेले आहे.

१२६ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[नवम


तील ते आरोप करून तुम्हांस स्थूल देहमय अथवा मनोमय बनता येते. जीवित आणि म्रुत्यु ही जुनी खुळे आम्हांस चिकटून बसली आहेत. वास्तविक कोणी जन्मास आला नव्हता आणि कोणी मरणारही नाही. आपण आपली दृष्टि मात्र बदलीत असतो, आणि एका परिस्थितीला जन्म व दुसरीला मृत्यु म्हणत असतो. तुम्हां पाश्चात्यांना मृत्यूची एवढी भीति वाटते हे पाहून मला खरोखरच फार वाईट वाटते. मरण म्हटल्याबरोबर तुम्ही अगदी गांगरून जाता. जीवितत्वा एखादा क्षण तरी अधिक लाभावा यासाठी भगीरथ प्रयत्न तुम्ही करीत असता. परमेश्वराजश्ळ तरी तुम्ही काय मागत असतां ? " मृत्यूनंतर आम्हांस चिरंतन जीवित दे" हेच. मेल्या- नंतरही जो जीवित तुम्हांस मिळेल असें कोणी सांगितले तर तुम्ही केवढे आनंदून जातां ! छे, छे; मृत्यूची इतकी खंत करूं नका. वास्तविक तुम्ही जन्मासच आला नाहीं; मग तुम्हांस मरण कोठचे ? मरण येईल अशी शंका तरी मला का यावी? मी मेलेला आहे अशी कल्पनाही मला होत नाही. मी मरून पडलो आहे अशी कल्पना करण्याचा यत्न करा; म्हणजे स्वतःचें मृत शरीर पाहण्यात आपण हजर आहो असें तुम्हांस आढळून येईल, तुमचे चैतन्य इतके सत्यरूप आहे की त्याचा विसर एक क्षणसुद्धा तुम्हांस पडत नाही. स्वतःला अस्तित्व आहे की नाही अशी शंका तरी तुमच्या मनांत कधी येते काय ? “मला अस्तित्व आहे" ही तर तुमची पहिली जाणीव आहे. सर्व सत्यांत हे अत्यंत उघड असें सत्य आहे. त्याचा अनुभव दर क्षणी येत आहे. याचा विसर पडला असे कधीच घडावयाचे नाही. यावरून अमृतत्वाची कल्पना मनुष्याच्या मनात स्वाभाविक आणि जन्मजात आहे असें निःसंशय सिद्ध होते. “मी मरेन" असें चुकूनसुद्धा कोणाच्या मनात येत नाही. “मी सर्वथा नष्ट होणार आहे" अशी कल्पनाही कोणास करवत नाही. मग ज्या विषयाची कल्पनासुद्धा आपणास होत नाही त्याजबद्दल वाद- विवाद कसला आणि त्याचा उहापोह तरी कशाला ? जो विषय इतका उघड आहे त्यात पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष संभवतच नाही.
 जड, सूक्ष्म अथवा चैतन्यात्मक यांपैकी कोणत्याही दृष्टीने तुम्ही पाहिले तरी:विश्व एकरूप हेच अखेरीस आढळून येते. आपल्या सध्याच्या अवस्थेत या विश्वाचा प्रत्यय आपणास दोन प्रकारचा येत आहे. एक शक्ति आणि