पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१४

हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ]एक उघडे रहस्य.९

मनुष्याने स्वतःच्या प्रतिमेबरहुकूम परमेश्वर घडविला' हेही तितकेच खरें आहे अशी त्याची खात्री झाली, आणि अशा विचारमालिकेच्या अखेरीस जो सिद्धांत त्याने ठरविला तो हा की परमेश्वर हा विश्वबाह्य नसून तो आपल्या हृदयांतच आहे. आपणास अत्यंत संनिध अशी जर काही वस्तु असेल तर ती परमात्मा हीच होय. ज्या परमात्म्याचा शोध आपण बाह्य जगांत करीत होतो तोच परमात्मा आपल्याच हृदयाच्या अंतर्भागांत आपणास सांपडला. तो आपल्या हृदयाचे हृदय आहे. ज्या मुक्तावस्थेचा शोध आपण बाह्यजगांत चालविला आणि जी बाह्यप्रदेशी आपणास सांपडेल अशी कल्पना आपण केली होती ती मुक्ति आपणापाशीच आपणास सांपडली. तिचा वास बाह्य जगांत व आपल्या अंतरांत आहे. तीच आपल्या आत्म्याचा आत्मा होय. तीच सत्य वस्तु; आणि ती सत्य वस्तु आपण स्वतःच आहों.

 अशा रीतीने आपल्या अस्तित्वाचें द्विधारूप आपणास पटते. अनंत आणि सान्त अशा दोन भिन्न रूपाचा वास एकाच ठिकाणी आहे असें आपणास आढळून येते. अनंत परमात्मा तोच सान्त जीवात्मा. जणूं काय अनंत परमात्मा बुद्धीच्या जाळ्यांत सांपडला आणि त्यामुळे तो सान्त आहे असा भ्रम उत्पन्न झाला; पण यामुळे तो अनंत वस्तुतः सान्त झाला असें मात्र नाही. त्याचे सत्यरूप अनंत हेच आहे.

 खरें ज्ञान ते हे. सत्यरूप परमात्मा बाह्य विश्वांत अथवा विश्वबाह्य नसून आपल्या हृदयसंपुटांत तो आहे असा अनुभव येणे याचें नांव ज्ञान. तो परमात्मा अनंत, निरुपाधिक आणि सदामुक्त असा आहे. ज्या भूमिकेवर आपणास निर्धास्त उभे राहतां येते ती भूमिका ही.

 या ज्ञानांत बाकीच्या साऱ्या अवस्थांचा लय होतो. येथे जन्म नाहीं, मृत्यु नाही आणि दुःखही नाही. सर्व पापपुण्यात्मक कल्पनांचा शेवट येथे होतो; आणि या अनेकविध सृष्टीत हे एक जो पाहतो, क्षणोक्षणी बदलणाऱ्या या विश्वांत हे चिरस्थायी रूप ज्याच्या प्रत्ययाला येते आणि सर्व आत्म्यांचा परमात्मा तो आहे अशी अनुभवाची खूणगांठ ज्याला पटते, त्यालाच चिरंतन शांतीचा लाभ होतो. त्याखेरीज अन्य कोणाला हा लाभ होत नाही हे त्रिवार सत्य आहे.