पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१४३

हे पान प्रमाणित केलेले आहे.

१३८ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवम


तरी यश येईल असा संभव दिसत नाही. हे प्रयत्न यापूर्वी जसे विफल झाले तसेच ते यापुढेही होतील असें भाकित करण्यास हरकत नाही. मनुष्याचा स्वभाव आहे तसाच चालू राहील तोपर्यंत कोणत्या तरी जड वस्तूची मदत त्याला लागणारच. प्रत्यक्ष दिसणाऱ्या अशा एखाद्या वस्तूला तो अवश्य मिठी मारणार. स्वतःच्या चित्तांतील कल्पनातरंग केवळ कल्पनामय आणि अधांतरी राहणे त्याला पसंत पडत नाही. चित्तांतील हे कल्पनातरंग प्रत्यक्ष सृष्टीत स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याची लालसा त्याला असते, आणि ती पूर्ण करण्याकरिता त्यांची संगती कोणत्या तरी जड पदार्थाशी तो घालतो. अशा रीतीने अमूर्त कल्पनासमूहाला मूर्तरूप देण्याची त्याची वहिवाट फार प्राचीन काळापासून आहे. अशा प्रकारच्या जड क्रिया नष्ट कराव्या असा उपक्रम महंमदी सुधारकांनी केला; पण त्यांत एक जड पदार्थ जाऊन त्याच्या जागी दुसरा येण्यापलीकडे अधिक कांहींच झाले नाही. अशाच प्रकारचा यत्न ख्रिस्ती धर्मातील प्रॉटेस्टंट पंथानेही केला आणि त्याची वा- टही तशीच लागली. यावरून बाह्य उपचार समूळ नाहीसे करणे शक्य नाहीं असे म्हणण्यास हरकत दिसत नाही. एका प्रकारचा विधी तुम्ही बंद केला तर त्या जागी आणखी एखादा नवा प्रकार येतो. कोणत्याही प्रकारचे बाह्य- विधी, प्रतिमा, अथवा चिन्हें ही पापमूलक आहेत असें मुसलमान समज- तात; पण स्वतःची काबा येथील मशीद मात्र त्यांना खपते, इतकेंच नव्हे तर ती परमपवित्र वाटते. प्रार्थना करतांना आपण त्या मशिदीत आहों अशी भावना प्रत्येक मुसलमानाने प्रार्थनेच्या वेळी करणे अवश्य आहे. इतर धर्माची बाह्य चिन्हें त्याला पापमय दिसतात आणि तसलीच स्वतःची चिन्हें तो पुण्यमय समजत असतो! मशिदीच्या भिंतींत बसविलेल्या एका काळ्या धोंड्याचे चुंबन प्रत्येक मुसलमान यात्रेकरूने करणे अवश्य आहे. अखेरच्या दिवशी परमेश्वर पापपुण्याचा निवाडा करील तेव्हां हा धोंडा प्रत्येकाबद्दल साक्ष देण्यास हजर राहणार आहे ! त्याचप्रमाणे झिमझिम येथील विहिरी- तील चुळकाभर तीर्थ जो कोणी प्राशन करील त्याला न्यायाच्या दिवशी दिव्य देह मिळणार असून त्यानंतर चिरजीवनही त्याला प्राप्त होईल!
 इतर धर्मात विशिष्ट आकाराच्या इमारती या चिन्हांच्या जागी येतात. चर्च हे स्थळ इतर कोणत्याही जागेहून अधिक पवित्र आहे असे प्रॉटेस्टंट पंथी