पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१५०

हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड.].भक्ति.१४५


काही वाईट नाही. मनुष्यांना धर्माभिमुख करण्याकरितां परमेश्वराने हे जुने धर्म प्रथम निर्माण करून त्यांच्या चित्ताची तयारी केली आणि नंतर खरा धर्म म्हणजे ख्रिस्ती धर्म प्रकट केला असे त्यांचे म्हणणे आहे. पूर्वीच्या त्यांच्या विरोधी दृष्टीच्या मानाने पाहतां इतकी सहिष्णुताही पुष्कळच आहे असे म्हणणे भाग आहे. पन्नास वर्षापूर्वी इतकेही शब्द त्यांनी आपल्या मुखावाटे काढले नसते. त्या वेळी ख्रिस्ती धर्माशिवाय बाकीचे सारे धर्म एकजात खोटे असेंच ते म्हणत होते. आतां ख्रिस्ती उपदेशकांच्या पदरीच ही सारी चूक होती असे नाही. असें म्हणणारे लोक साऱ्या जगभर प्रत्येक धर्मात आहेत. 'माझें खरें आणि बाकीचें तें खोटें, ' असें म्हणणारे लोक प्रत्येक राष्ट्रांत आणि प्रत्येक धर्मात असतात. आपण करतो तें उत्तम आणि त्याप्रमाणेच बाकीच्यांनी करणे त्यांस कल्याणप्रद आहे असे वाटणे हा मनुष्य- स्वभावच आहे. अशाच वेळी अनेक धर्माचा अभ्यास करणे फार उपयुक्त होतें. जे विचार केवळ आपलेच आहेत असे आपणास वाटत असतें तेच जुन्या काळी अस्तित्वात होते, एवढेच नव्हे तर आपल्यापेक्षा अधिक सुसं- गत रीतीने त्यांची मांडणी केलेली होती, असें या अभ्यासाने आपणास आढ- ळून येते. आपल्या विचारांतील बोबडेपणाही या जुन्या काळच्या विचारांत नव्हता असे आपल्या प्रत्ययास येईल.
 धर्माभ्यासाच्या आरंभींच्या काली बाह्योपचारांची आवश्यकता असते; पण आपणांस धर्मतत्त्वांचे ज्ञान व्हावें अशी खरी तळमळ ज्याला असते, तो हे बाह्योपचार लवकर टाकून देतो आणि सत्याच्या भेटीसाठी पुढील मार्ग चालू लागतो व ज्या ठिकाणी असल्या विधिविधानांचे महत्त्व कांहीं नाहीं अशा स्थळी पोहचतो. बाह्योपचारांची आवड अथवा आवश्यकता ही मनाच्या बाल्यावस्थेची द्योतक आहेत. त्याला प्रगल्भ दशा येऊ लागली म्हणजे असली क्षुद आवड ते आपोआप सोडून देते. देवळे, मशिदी, चचें, घंटा, ग्रंथ ही सारी प्रथमावस्थेतील साधने आहेत. लहान मुलांना चित्रांच्या साहाय्याने शिक्षण देतात, त्याचप्रमाणे धमीभ्यासाच्या धूळपाटीवर बसणाऱ्या मुलांस ही साधनें उपयोगी पडतात. यांच्या साहाय्याने अक्षरओळख होऊन मन प्रगल्भ होऊ लागले म्हणजे ही साधनें हळुहळु सुटत जातात. धर्माच्या मार्गावर ज्याला आरूढ व्हावयाचे असेल त्याला या साधनांचा आश्रय

स्वा०वि० खं०-९-१०