पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१५१

हे पान प्रमाणित केलेले आहे.

१४६ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम


आरंभी केल्याशिवाय गत्यंतर नाही. परमेश्वराच्या भेटीची त्याची तळमळ वाढत गेली म्हणजे त्याच्या ठिकाणी खरी भक्ति उत्पन्न होऊ लागते. पण अशी तळमळ खरोखर किती जणांस लागली आहे हाच काय तो प्रश्न आहे. बहुतेकांचा सांप्रतचा धर्म पाहिला तर स्वतःस एखाद्या विशिष्ट पंथाचा म्हण- विणे, काही विशिष्ट मतें आपणांस पटली असें तोंडाने म्हणणे अथवा फारच झाले तर बुद्धिवाद करून तत्त्वांचा काथ्याकूट करणे इतक्यापुरताच आहे. पण खरा धर्म या वस्तूंत नाही. जे आपण तोंडाने बोलतों तें प्रत्यक्ष होऊन जाणे याचें नांव धर्म; आत्मानुभव घेणे हा धर्म. धर्मतत्त्वांसंबंधी अनेक प्रका- रचे वादविवाद आपणांस सध्या सर्वत्र ऐकू येतात. जीवात्मा आणि परमात्मा यांजबद्दलही शिळोप्याच्या गोष्टी आपल्या कानी कमी पडतात असे नाही. पण या हजारों वावदुकांपैकी कोणालाही तुम्ही “परमेश्वराचा अनुभव तुला झाला आहे काय" असा प्रश्न केला तर त्याला “होय' असें ठांसून उत्तर देण्याची त्याची छाती आहे काय ? “ज्या आत्म्याबद्दल इतकी बडबड तूं करतोस त्याची प्रत्यक्ष ओळख तुला आहे काय ?" या प्रश्नाला "नाही" हेच उत्तर तुम्हांस सर्वत्र ऐकू येईल; आणि असे असतांही अत्यंत नवलाची गोष्ट ही की यांपैकी प्रत्येक जण दुसऱ्याशी मोठया कडाक्याचे वाद या बाबींत घालीत असतो!
 एके वेळी हिंदुस्थानांत असेच अनेक पंथाचे लोक एकत्र बसले असतां त्यांच्यांत वाद सुरू झाला. एक म्हणतो “शिव हाच खरा परमेश्वर." दुसरा म्हणाला “छे, छे, विष्णु हाच खरा देव! अशा रीतीने प्रत्येकजण आपा- पल्या इष्ट देवतांबद्दल बोलू लागला. असल्या प्रकारच्या वादविवादाचा शेवट लागणे कधीच शक्य नाही. हा वाद अशा प्रकारे चालू आहे इतक्यांत एक सत्पुरुष तेथें आला, तेव्हा या सर्व मंडळींनी आपापले मुद्दे त्याजपुढे मांडिले. तेव्हां त्यांपैकी शिवभक्त होता, त्याकडे वळून तो साधुपुरुष ह्मणाला, "तुम्हीं शिवाची भेट घेतली आहे काय ? तुमची त्याची पुसट ओळख तरी आहे काय ? जर नसेल तर तोच मोठा असें तुम्ही कसें ह्मणतां ?" त्यानं- तर विष्णुभक्ताला तो म्हणाला, “महाराज, आपण तरी विष्णूची भेट घेतली आहे काय ?" हाच प्रश्न बाकीच्या साऱ्या जणांस त्याने केला. तेव्हा यांपैकी अनुभवी असा कोणीही नाहीं असें त्या साधूला आढळून आले. आत्मानुभव