पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप. १६७


अर्थ लोकांच्या मनांत रूढ झाला असावा. अद्वैतवादी म्हणजेच खरा वेदान्ती असें लोकांस वाटण्याचे कारण बहुधा हेच असावे असे मला वाटते. रूढी कशीही असली तरी वेदान्त या शब्दांत सर्व मतांचा आणि शाखांचा अंतर्भाव झाला पाहिजे हे निर्विवाद आहे. श्रुतिग्रंथ' हे प्राचीनतम वाङ्मय आहे, याबद्दल आमच्या पंडितांत तरी वाद नाही. त्याचप्रमाणे अर्वाचीन पाश्चात्य पंडितांच्या मते श्रुतिग्रंथांतील वेगवेगळे भाग आगेमागे लिहिले गेले असें ठरत असले, तरी त्यांचे हे मत ग्राह्य समजण्यास आम्ही तयार नाही. सर्व श्रुती एकाच काळी निर्माण झाल्या, या आमच्या समजुतींत यत्कि- चित्ही फरक करण्यास आम्ही तयार नाही. किंबहुना श्रुती अमुक एका कालीं निर्माण झाल्या असेंही घडलें नाहीं; तर त्यांचे अस्तित्व चिरंतन कालापासून आहे. परमात्म्याच्या चित्तांत श्रुतींना अस्तित्व नव्हतें असें कधीच घडलें नाहीं असेंही आम्ही म्हणतों. वेदान्त या शब्दांचा उपयोग मी करतो त्यावेळी जो भावार्थ माझ्या मनांत असतो तो इतका विस्तृत आहे. द्वैत, विशिष्टाद्वैत आणि अद्वैत या सा-यांचा अंतर्भाव वेदान्त या शब्दांत होतो असें माझें मत आहे. फार काय, पण जैन आणि बौद्ध या धर्माची तशी मर्जी असेल, तर त्यांसही आमच्या पंक्तीत बसविण्याची आमची तयारी आहे. तसे करण्या- इतकें औदार्य आमच्या अंतःकरणांत खास आहे; पण आपला अंतर्भाव वेदान्त धर्मात होऊ नये असा त्यांचाच हट्ट आहे; मग आम्हांकडून तयारी असून काय उपयोग ? बौद्ध धर्माचे सार काढलें तर उपनिषदांतील तत्त्वांहून त्याचा मथितार्थ वेगळा नाहीं असें आपणांस आढळून येईल. बौद्ध धर्मांत अत्युच्च नीतितत्त्वांचा अंतर्भाव झाला आहे, अशी त्याची ख्याती आहे; पण ही सारी तत्त्वे एक अथवा अनेक उपनिषद्ग्रंथांतून जशीच्या तशीच घेतली आहेत, हे ध्यानात ठेवण्यासारखे आहे. त्याचप्रमाणे जैन धर्मातील ग्राह्य मतेंही उपनिषदांत तुम्हांस आढळतील. आता त्यांतील तर्कबाह्य भाग मात्र उपनिषदांत कोठे आढळावयाचा नाही, हे आम्ही प्रांजलपणे कबूल करतो. हिंदुस्थानांत आजपर्यंत जितकी मते उद्भवली आहेत, त्या साऱ्यांचे बीज उपनिषदांत तुम्हांस सांपडेल. भक्तिमार्गाचा मागमूसहि उपनिषदांत आढ- ळत नाही, असे कोणी कोणी म्हणतात; पण हे म्हणणे अगदी निराधार आहे. उपनिषदांचा अभ्यास ज्यांनी मनःपूर्वक केला असेल, त्यांस या .