पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१९२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड ] हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप. १८७.


तुम्हांस पटेल. चालतांना भूमीलाही नमविण्याचे सामर्थ्य तुमच्या तंगड्यांत आले म्हणजे उपनिषदांचा अर्थ तुम्हांस अधिक चांगला कळू लागेल. या सर्व गोष्टी होण्यास तुमच्या अंगी आधी पौरुष खेळले पाहिजे. आमच्या गरजा काय आहेत याचा विचार आधी करून मग पुढील मार्गाची तरतूद आपणास लावावयाची आहे.
 मी वेदान्ताचा उपदेश करतो म्हणून कित्येक लोक माझा तिरस्कार करीत असतात. द्वैत, अद्वैत अथवा दुसरे कोणतेही मत लोकांस सांगण्याची माझी इच्छा नाही. एखाद्या विशिष्ट मताचा प्रसार करावा अथवा एखादें मत खोडून काढावे, असा हेतु माझ्या मनांत कधीच नव्हता. आत्मा सच्चिदानं रूप आहे एवढेच मला सर्वांस सांगावयाचे आहे; आणि वास्तविक पाहतां सध्याच्या काळी एवढयाच धर्माची जरूर आपणांस आहे. मला एखादें मूल असते तर 'तत्त्वमसि' हे सूत्र त्याच्या जन्मापासून त्याच्या कानांत मी ओरडत राहिलो असतो. राणी मदालसेची कथा पुराणांत तुम्ही वाचली असेलच. आपलें तान्हें मूल पाळण्यात घालून ती हालवीत असतां, “तूं पवित्र, निष्कलंक, सर्वशक्तिमान् आहेस' अशा अर्थाचे गीत ती म्हणत असे. या कथेत फार तात्पर्य भरलेले आहे. 'अहं ब्रह्मास्मि' असें चिंतन मनःपूर्वक तुम्ही केले तर तुम्ही खरोखरच ब्रह्मरूप व्हाल. साऱ्या जगभर मी फिरलों आणि अनुभव घेतला तो हाच. मनुष्यप्राणी पापी आहे असें पाश्चात्य लोक तोंडाने म्हणोत; पण तशी त्यांची श्रद्धा मात्र खास नाही. आपण पापी आहों असें इंग्रज लोकांस मनापासून वाटले असते, तर त्यांची योग्यता मध्य आफ्रिकेंतील शिद्यांहून अधिक असतीना. त्यांचा तसा विश्वास नाहीं ही परमेश्वराची त्यांजवर मोठी कृपाच होय. आपण पापी, आपण क्षुद्र असें इंग्रज लोकांस स्वप्नांतही वाटत नाहीं; एवढेच नव्हे, तर उलट आपण जगाचे धनी आहों असें त्यांना वाटते. जगाचे धनीपण जन्मादारभ्यच आपणास प्राप्त झाले आहे, अशी त्यांची भावना आहे. 'कतुमकर्तुम्' शक्ति आपल्या अंगी असून, वाटेल तशी जगाची घडामोड आपण करू शकू असें त्यांस वाटते. उद्यां चंद्रसूर्यावर जाण्याची इच्छा झाली तरी तेसुद्धा आपण करूं असा त्यांचा विश्वास आहे. या श्रद्धेमुळेच इंग्रजांचे राष्ट्र आज मोठे बनले आहे. मनुष्यप्राणी दुबळा आणि पापी आहे असें ख्रिस्ती धर्मोपदेशक