पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२०५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२०० स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ .[ नवम


ऋषिवर्य अत्यंत मोठे होते आणि त्यांच्याचप्रमाणे अवतारी पुरुषही अत्यंत उज्ज्वल होते; पण असल्या पुरुषांचीही गरज ही तत्त्वे बाळगीत नाहीत. हिंदुस्थानांतील शृतिप्रणीत धर्माचे स्वातंत्र्य त्रिकालाबाधित कसे आहे, ही गोष्ट तुमच्या लक्ष्यांत आतां आली असेलच; आणि याकरितांच विश्वव्यापी धर्म होण्याची पात्रता कोणत्याहि धर्मात असेल तर ती वेदांत धर्मातच आहे असे आम्ही का म्हणतों हेंहि तुमच्या ध्यानांत आले असेलच. किंबहुना आजच, हा धर्म विश्वव्यापी होऊन राहिला आहे. कारण, तो फक्त तत्त्वांचा द्रष्टा आहे. फक्त तत्त्वे तो शिकवितो आणि कोणाही व्यक्तीचे नांव तो पुढे करीत नाही. ज्या धर्माची उभारणी कोणाही व्यक्तीच्या चरित्रावर झालेली असते, तो धर्म एकाच वेळी सा-या जगाला पटेल ही गोष्ट त्रिकालांतही शक्य नाही. केवळ आमच्या एकाच देशाचे उदाहरण घेतले तरी त्यांत किती तरी महापुरुष होऊन गेलेले आहेत. एखाद्या शहरांत पाहिले तर अनेक पुढारी असून त्यांपैकी प्रत्येकाला काही ना काही भक्त असतातच. स्वतःच्या मनाला पटेल त्याच व्यक्तीला पूज्य मानण्याची प्रवृत्ति अनादिकालापासून चालू आहे. अशा स्थितीत एकच महंमद, एकच बुद्ध अथवा एकच ख्रिस्त सर्व मनुष्यांस सारखाच कसा पटेल ? जगांतील सारी माणसे कोणाही एकाच व्यक्तीला गुरु स्थानी कसे मानतील. अशा एकाच व्यक्तीने सांगितलेला तेवढाच धर्म खरा, अशी एकच व्यक्ति म्हणेल तेवढीच नीति खरी, अथवा अशी एकच व्यक्ति सांगेल तेवढाच कायतो खरा शास्त्रार्थ असें मानावयास सारे जग कसे तयार होणार ? उलट पक्षी वेदान्त धर्म कोणाहि व्यक्तीला पुढे करीत नाही. अमक्या व्यक्तीने सांगितली म्हणून अमुक गोष्ट खरी माना, असा आग्रह तो धरीत नाही.
 मनुष्याचा मूलस्वभाव हाच त्याचा अखेरचा शास्त्रार्थ आहे. मनुष्याच्या ठिकाणी जी चिर स्वरूपाची चैतन्य शक्ति आहे, तीच वेदान्त धर्माची अखेरची अधिष्ठात्री देवता; तीच त्याची नीति, आणि तिची जागृति तोच त्याचा धर्म मार्ग. मनुष्य स्वभावतःच पूर्ण चैतन्यरूप आहे असें तो म्हणतो. हे पूर्णत्व बाहेरून कोठून प्राप्त करून घ्यावयाचे नसल्यामुळे कोणाचीही मदत त्याला नको असें वेदान्त धर्माचे सांगणे आहे. आतां यांत आणखीही एक मुद्दा आहे. परोक्ष तत्वांचे आकलन पूर्णपणे करण्यास लागणारें बुद्धीचे सामर्थ्य सामान्य