पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२१

हे पान प्रमाणित केलेले आहे.

१६ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम

नाही हे मी जाणतो; पण जगांत राहून त्याची नश्वरता ज्याने जाणिली आणि ज्याला सत्स्वरूपाची भेट झाली, असा कोणता मनुष्य दीर्घायुष्यांत आनंद मानील ? नाचत आणि गात आयुष्य घालविणे यांत खरें रहस्य काय आहे हैं ज्याने जाणले, त्याला पुष्कळ आयुष्याची मातब्बरी कशी वाटेल ? याकरितां या मानवी आयुष्याच्या पलीकडे काय आहे हेच आपण कृपा करून मला सांगावें. याखेरीज दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची इच्छा मी करीत नाही. एवढें रहस्य समजावें इतकीच माझी इच्छा आहे." नाचिकेताचे हे भाषण ऐकून यमराजालाही मोठा संतोष झाला. अशा प्रकारच्या ज्ञानप्राप्तीची इच्छा होणे हे मुमुक्षेचे लक्षण आहे. सत्यवस्तूवांचून दुसऱ्या कशाची अपेक्षा चित्तांत नसणे ही मुमुक्षुत्वाची पहिली पायरी आहे, ही गोष्ट आपण येथे ध्यानांत आणली पाहिजे. यमाने अनेक प्रकारच्या वस्तू देऊ केल्या असतांही या मुलाने त्यांचा त्याग कसा केला हे पहा. राज्यवैभव, मोठी संपत्ति, दीर्घ आयुष्य अशा अनेक गोष्टींवर त्याने पाणी सोडलें. सत्य वस्तूचे ज्ञान आपणास व्हावें या इच्छेवांचून दुसऱ्या कोणत्याही इच्छेला त्याने आपल्या मनांत अवसर दिला नाही. मनाची स्थिति अशा प्रकारची होईल तेव्हांच सत्य वस्तूचे दर्शन आपणास होईल. नाचिकेताचे भाषण ऐकून संतुष्ट झालेला यमराज म्हणाला " नाचिकेता, मनुष्यापुढे दोन मार्ग मोकळे असतात. एक प्रवृत्तिपर म्हणजे इंद्रियजन्य सुखें प्राप्त करून घेण्याचा आणि दुसरा निवृत्तिपर म्हणजे कैवल्याचा. मनुष्यजाति अनेक पंथांनी जातांना दिसली तरी त्या साऱ्या पंथांचें पर्यवसान या दोहोंपैकी कोणत्यातरी एका मार्गात व्हावयाचें. या दोन मार्गापैकी कैवल्याचा मार्ग जो स्वीकारतो तोच खरा पंडित होय-तोच साधु. प्रवृत्तीच्या मार्गानें जो जाऊं लागेल तो अंती अधःपाताला पोहोचल्याशिवाय राहणार नाही. नाचिकेता, तुझी धन्य असो. इंद्रियजन्य सुखें देणाऱ्या वस्तूची इच्छा तूं धरली नाहीस. प्रवृत्तिमार्गाला तूं जावेंस एवढयाकरितां मी पुष्कळ खटपट करून पाहिली, पण माझ्या खटपटीला तूं यश येऊ दिलें नाहीस. केवळ चैनीच्या वस्तूपेक्षा ज्ञानाची योग्यता किती तरी अधिक मोठी आहे हे तूं जाणलेंस.

 “ अज्ञानग्रस्त होत्साता जो मनुष्य आपलें सारें आयुष्य नुसत्या चैनीत घालवितो तो पशुहुन निराळा नव्हे, ही गोष्ट तुझ्या लक्ष्यात आली आहे.