पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] आपणांपुढील कार्य .२३३ साचा:Run

तात्त्विक वाङ्मयाचा अभ्यास सुरू केला तर आरंभी त्याला तो कंटाळवाणा झाल्यावांचून राहणार नाही. अर्वाचीन वाङ्मयाप्रमाणे त्यांत चित्ताची गडबड उडविणारें विलक्षण उत्साहजनक अथवा विलक्षण क्रांतिकारक असें कांहींच त्याला आढळून यावयाचे नाही. वाचनास सुरवात केल्यावरोबर वाचकाचें चित्त एकदम आकर्षून जाऊन त्यांत मोठी खळबळ उडावी असे प्राचीन वाङ्मयांत कांहींच नाही. खिस्ती धर्माचा इतिहास पाहिला तर त्याच्या नांवा खाली केवढे प्रचंड उत्पात युरोपांत घडून आले याचा विचार करा. याशी तुलना करण्यास आमच्या धर्माच्या इतिहासांत तुम्हांस कांहींच सांपडावयाचे नाही. यामुळे त्या वाङ्मयाचे वाचन आरंभापासूनच चित्तांत खळबळ उडवून देते. पण हा उत्साह अगदी क्षणिक असतो. पुस्तक मिटले की, त्याबरोबरच वाचकाचे चित्त कोरे होऊन जाते. आपण काय वाचलें याचीहि शुद्धि त्याला रहात नाही. हिंदुस्थानांतील धार्मिक वाङ्मय याहून अगदी वेगळ्या प्रकारचे आहे. ते शुद्ध शांततामय आणि अगदी थंड्या स्वभावाचे आहे. तुमच्या चित्तावर त्याचा पगडा तुम्हांस नकळत बसत असतो; पण तुमचा हा अभ्यास कांही काळ असाच चालू राहिला म्हणजे त्याचा पगडा तुमच्या चित्तावर इतका पक्का बसतो की, त्याचा मोह तुम्हांस अनिवार होतो. तुमच्या चित्तास बसलेली मिठी तुम्हांस सोडवत नाही. आमच्या वाङ्मयाच्या जाळ्यांत जो एकवार सांपडला त्याचे हातपाय त्यांत पक्के जखडले गेले ह्मणून समजावें.
 रात्रीच्या प्रशांत समयीं दंव पडते, तेव्हा त्याचा आवाज कोणासहि ऐकू येत नाही अथवा ते कोणाच्या दृष्टिपथांतहि येत नाही. तथापि त्याच्या सिंचनाने अत्यंत परिमल युक्त अशी गुलाबाची फुलें हलतात हे मात्र खरें. जगाच्या विचारभांडारांत भरतभूमीने टाकलेली भर अशाच प्रकारची आहे. या विचारांचे आगमन ढोलांच्या आणि नगा-यांच्या दणदणाटाने आगाऊ सुचविले गेले नव्हते. ते जगांत संचार करीत आहेत इतकीहि जाणीव कोणास उत्प्नन्न झाली नाही; पण असे असतांहि त्यांचा परिणाम सा-या जगावर चिरस्थायी झाला आहे. जगाच्या विचारांत त्यांनी क्रांति करून सोडली आहे. पण मौजेची गोष्ट ही की, ही क्रांति केव्हां झाली हेही कोणाच्या लक्ष्यांत आले नाही. एका गृहस्थाने सहज बोलता बोलतां मला म्हटले 'एखाद्या विशिष्ट ग्रंथाचा

कर्ता कोण याचा शोध हिंदुस्थानांत लागणे हे मोठे बिकट कर्म आहे.'