पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.] आपणांपुढील कार्य. २३५.


प्रवेश साऱ्या जगांत झाला असल्याचा पुरावा हल्ली निदर्शनास येत असून त्यांत आणखी नवी भर प्रत्यहीं पडत आहे. बौद्ध धर्माचा प्रवेश चिनांत होण्याच्या अगोदर वेदांत तत्त्वे तेथें शिरली होती. त्याचप्रमाणे इराण वगैरे देशांतहि त्यांचा प्रवेश झाला होता. पुढे ग्रीक साम्राज्याच्या वेळीहि असाच प्रकार घडून आला. त्यांच्या तरवारीच्या मागोमाग हिंदु तत्त्वज्ञान संचार करीत होते. ख्रिस्ताच्या तत्त्वज्ञानाचा केवढाहि गौरव तुम्हीं केला, आणि त्यामागो माग झालेल्या संस्कृतीची कितीहि स्तोत्रे तुम्हीं गाइली, तरी हिंदु तत्त्वग्रंथांत इतस्ततः विखुरलेल्या अनेक रत्नांपैकी एका अल्पांशापासूनच ख्रिस्ताची ही सारी सृष्टि निर्माण झाली आहे, हे लक्षात ठेवणे भाग आहे. हिंदु धर्मांतूनच बौद्ध धर्म निर्माण झाला. बौद्ध धर्म हे हिंदु धर्माचेंच एक बंडखोर बालक आहे; आणि ख्रिस्ती धर्म हे बौद्ध धर्माचें गोधडीवजा अनुकरण आहे. अशा रीतीनें प्रत्येक शकांतराच्या वेळी हिंदु धर्मज्ञानाची लाट जगावर पसरली आहे; आणि आताही हा शकांतराचा काळ पुनः प्राप्त झाला आहे. इंग्रजी साम्राज्याखाली जगांतील दूरदूरची स्थलें एकत्र झाली आहेत; आणि त्यांतहि विशेष हा की, रोमन साम्राज्याप्रमाणे इंग्रजी साम्राज्याचे मार्ग केवळ जमिनीवरच आंखलेले नसून महासागरांचा पृष्ठभागहि त्यांनी व्यापला आहे. एका महासागरांतून दुसऱ्या कोणत्याहि महासागराकडे या रस्त्याने सुखरूप जाता येते, आणि सध्यांच्या काळी पूर्वीच्या दळणवळणाच्या साधनांत विद्युच्छक्तीनेंहि आणखी एक नवीच भर घातली आहे. अशा स्थितीत आपल्या जीवन हेतूच्या पूर्तीस्तव भरतभूमीनेंहि जागे व्हावें हें रास्तच आहे. जगाच्या संस्कृतीला आपल्यापरी तिनेंहि हातभार लावावा हे इष्ट आहे. माझ्यासारख्या मनुष्याने उठून इंग्लं डचा आणि अमेरिकेचा प्रवास करावा आणि तेथें धर्मप्रचाराचे कार्य करावें ही गोष्ट काकतालीय न्यायाने घडली असून पूर्वपरंपरेप्रमाणे पाहतां ती सृष्टि क्रमाला अनुसरूनच घडली. हिंदुस्थानाच्या कार्याचा प्रसार जगभर होण्याची वेळ आतां आली आहे, ही गोष्ट आपणांपैकी प्रत्येकाने जाणून घेतली पाहिजे. या कार्याच्या प्रसाराला अत्यंत अनुकूल असा सांप्रतचा काल आहे आणि या वेळी आपले जगज्जेत्याचे कार्य हिंदुस्थानाने पुनः केले पाहिजे. आपणांस केवळ आपल्याच देशाची उन्नति साधावयाची आहे असें नाही. आपल्या साऱ्या कार्यक्रमाचा तो लहानसा अंश मात्र आहे. कल्पनेच्या अत्यंत विस्तृ- .