पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.]आपणांपुढील कार्य.२४३


आमची ही तत्त्वे प्रत्यक्षत्वास येतील तो आम्हांस पूज्य; आणि तो मोठा म्हणून पूज्य नव्हे, तर आमची तत्त्वे आम्हांस तेथे दिसतात म्हणून तो पूज्य. ही तत्त्वे तेथे दिसू लागतांच कोट्यवधि हिंदू लोक तेथे धावत येतात. आमची ही तत्त्वे सुरक्षित आहेत तोवर एकच काय पण हजारों बुद्ध जन्मास येतील. पण ही तत्त्वे नष्ट झाली आणि त्यांची विस्मृति आम्हांस पडली, तर मात्र आमच्या धर्माची काय वाट लागेल हे सांगता येत नाही. तत्त्वांना सोडून ऐतिहासिक व्यक्तींच्या झेंड्याभोवती आम्ही गोळा होऊ लागलों, की आमचा धर्महि आम्हांस सोडून जाण्याच्या पंथास लागेल. कोण त्याहि व्यक्तीला इतकें प्राधान्य न देणारा धर्म जगांत एखादा असेल तर तो आमचाच धर्म होय; पण असे असतांहि आम्ही सारे अवतारी पुरुष अगदी बाद केले आहेत असेंहि नाही. अशा शेंकडों पुरुषांना आमच्या धर्मात अवकाश आहे. आजपर्यंत असे शेंकडों पुरुष होऊन गेले आणि उद्या दुसरे शेकडों येणार असले तर त्यांनाहि आम्हांपाशी स्थळ आहे. मुद्दा इतकाच की, त्यांच्या द्वारे आमची तत्त्वे आम्हांस दिसली पाहिजेत. कोणत्या तरी उच्च तत्त्वांचे स्पष्टीकरण त्यांच्या द्वारे झाले पाहिजे इतकीच आमची अट आहे. आमच्या धर्माचा हा विशेष आपण लक्षात ठेविला पाहिजे. आजपर्यंत जशी ही तत्त्वे सुरक्षित राहिली तशीच ती पुढेहि ठेव ण्याच जबाबदारी आपणांपैकी प्रत्येकाच्या शिरावर आहे. त्याचप्रमाणे कालांतराने त्यांजवर वाढणारी बांडगुळे छाटून टाकून मूळचे उज्ज्वल रूप कायम राखणे, हेहि आपणा प्रत्येकाचे कर्तव्य आहे. भरतभूमीवर आजपर्यंत अनेक घोरपडी आल्या, हिंदुकुलाची भयंकर अवनति झाली, तथापि तशा स्थितींतहि वेदांत तत्त्वे मलिन झाली नाहीत हें आश्चर्य नव्हे काय? त्यांना मलिन करण्याची छातीच कोणास झाली नाही. श्रुतिग्रंथांइतकें अबाधित राहिलेलें धार्मिक वाड्मय जगाच्या इतिहासांत एकहि नाही. जगांतील बाकीच्या वाङ्मयाशी तुलना करून पाहतां श्रतिग्रंथ अगदी सोवळे राहिले आहेत असें आपणांस दिसून येईल. त्यांत कोणी क्षेपक भाग घुसडला नाही; मूळ संहि तेची ओढाताण अथवा छाटाछाट कोणी केली नाही आणि त्यांतील विचा रांचे मर्महि आजतागाईत पूर्वीसारखेंच राहिले आहे. उत्पत्तिकाली श्रति

ग्रंथांनी जें मार्गदर्शकाचे कार्य केलें तेंच कार्य ते आजहि करीत आहेत.