पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२९१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२८६ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[नवम


विचार कोणीहि करणार नाही. मात्र तुमची आत्मश्रद्धा दृढ पाहिजे. तुमचें वर्तन पवित्र असले पाहिजे; आणि प्रत्येक कार्यात तुमचे अंतःकरण पूर्णपणे गुंतले पाहिजे. हे कार्य साधण्याकरितांच आपला जन्म आहे, अशी श्रद्धा बाळगा. बंगाली तरुणांनो, हिंदुस्थानाचा उद्धार तुमच्याच हातून होणार आहे. तुम्हांला हे खरे वाटो अगर न वाटो; पण हे मी निश्चयाने सांगतो की, हे उद्धाराचे कार्य तुमच्याच हातून होणार आहे. मला देह आहे आणि आत्मा आहे, हे जितके खरें, तितकेंच तुम्ही भावी उन्नतीचे कारागीर आम्हां, हेहि खरें आहे. याकरितांच तुम्हां बंगाली तरुणांकडे माझें अंतःकरण नेहमी ओढ घेतें. तुम्ही निद्रव्य आहां, हीच माझ्या आशेची जागा आहे. तुम्ही दरिद्री आहां म्हणूनच कार्यकर्ते होऊ शकाल. तुम्ही अकिंचन आहां म्हणूनच या कार्याला आपले सारें अंतःकरण वाहाल. तुम्ही भिकारी आहां, म्हणून सर्वसंगपरि त्यागी होऊ शकाल. तुम्ही भिकारी आहां म्हणूनच हा उपदेश वारंवार मी तुम्हांला करितो. हा जसा माझा जीवनहेतु तसाच तो तुमचाहि आहे. तुम्ही द्वैती की अद्वैती की दुसऱ्याच कांहीं पंथाचे आहां, हा विचार मी करीत नाही. हिंदुस्थानांत शेकडों मतें प्रचलित असली, तरी त्या सर्वांच्या पोटी एकच सामान्य सूत्र आहे; आणि याच सूत्राने आपण सारे बद्ध झालेले आहों, हा

मुद्दा साऱ्या हिंदी राष्ट्राला पटेल असे करणे हे तुमचे कार्य आहे.


***********