पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/३६

हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड] याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी. ३१

देहाची जी मर्यादा तीच माझ्या प्रेमाचीही मर्यादा. प्रेम मर्यादित झाले की त्याजपासून केव्हांना केव्हां दुःखप्राप्ति व्हावयाचीच. तिच्या देहाचा अंत झाला की माझ्या प्रेमाचाही अंत होऊन अखेरीस दुःख तेवढे शिल्लक राहावयाचे; पण स्त्रीही आत्मरूपच आहे, विश्वव्यापी आहे, असें मी जाणतों तेव्हां माझें प्रेम विशिष्ट देहांत मर्यादित राहात नसून ते विश्वव्यापी होतें. तें विश्वव्यापी झाले म्हणजे पूर्णत्व पावून अनंत होते. मग त्यापासून दुःखप्राप्ति कशी होणार ? हाच नियम सर्वत्र लागू आहे. आत्मरूपाहून वेगळा या दृष्टीने एखाद्या पदार्थावर आपण प्रेम करू लागलों की तो आत्मरूपापासून ताबडतोब वेगळा होतो. तो आत्मरूपापासून वेगळा झाला की विश्वापासूनही वेगळा होतो. अशा स्थितींत विश्वाच्या कायद्यांच्या तडाक्यांत तो सांपडतो. क्रिया आणि प्रतिक्रिया तेथे सुरू होतात, व अशा कियाप्रतिक्रियांपासून आनंद आणि दुःख अशी जोडो उत्पन्न होते. आणि या दोहोंचाही स्वीकार करणे मला भाग पडते. आत्मरूपाहून भिन्न या दृष्टीने ज्या ज्या पदार्थावर आपले प्रेम जडते त्या त्या पदार्थापासून दुःखाची प्राप्ति आपणास हटकून होते; पण प्रत्येक वस्तु परमात्मरूपच आहे हे जाणून तिजवर आपण प्रेम करतों तेव्हां त्या प्रेमापासून दुःखाची उत्पत्ति होणे शक्य नाहीं; कारण तेथें क्रिया आणि प्रतिक्रिया यांचा अभाव असतो. पूर्णानंदाची अवस्था ती हीच. ही अवस्था कशी प्राप्त करून घ्यावयाची?
 ही स्थिति आपण कशी प्राप्त करून घ्यावी याचा मार्गही महर्षि याज्ञवल्क्यांनी सांगितला आहे. विश्व अनंत आहे, अमर्याद आहे. प्रथम आत्म्याला जाणल्याशिवाय या अमर्याद विश्वांतील प्रत्येक वस्तु आत्मरूप आहे हे आपणास कसे समजेल ? " एखाद्या मृदंगाचा आवाज आपणास दुरून ऐकू आला तर तो आवाज आपणास पकडता येत नाही अथवा तो बंदही करतां येत नाही. जेथून तो आवाज येतो त्या जाग्यापासून आपणापर्यंत अंतर मोठे असल्यामुळे तो आपणास बंद करता येत नाही; पण आपण मृदंगाजवळ जाऊन त्यावर हात ठेवला की आवाज ताबडतोब बंद झालाच. आपणापासून दूर अंतरावर शंखनाद होत आहे तोपर्यंत तो बंद करण्याचे साधन आपणांस प्राप्त होत नाही; पण आपण त्याच्याजवळ जाऊन पोहोंचलों की तो नाद आपणास ताबडतोब बंद करता येतो. त्याचप्रमाणे एखाद्या