पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/३७

हे पान प्रमाणित केलेले आहे.

३२ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम

विण्यांतून निघणारा सूर वीणा आपल्या हाती आल्यानंतर आपणास बंद करता येतो. ओलसर जळण जळत असले म्हणजे त्यांतून पुष्कळ धूर निघतो व ठिणग्याही पुष्कळ उडत असतात. अशाच रीतीने या ॐकार रूपांतून ज्ञानस्फुलिंग बाहेर पडत असतात. सर्व कांही याच ॐकारांतून निर्माण झाले आहे. ॐकाराच्या श्वासांतूनच जणू काय सर्व ज्ञान बाहेर पडले आहे. ज्याप्रमाणे सर्व जलाचा अखेरचा मुक्काम समुद्र हा आहे, अथवा स्पर्शाची जागा त्वचा ही आहे, अथवा सर्व गंधाचा मध्यबिंदु नाक हे आहे, अथवा सर्व रसांचे ठिकाण जीभ हेंच आहे, अथवा सर्व रूपांचा मूळ हेतु ज्याप्रमाणे डोळे हेच आहेत, अथवा ज्याप्रमाणे सर्व शब्द कानांच्या ठिकाणी एकरूपता पावतात, अथवा सर्व विचारांचे मूलस्थान जसें मन हेच आहे, अथवा सर्व ज्ञानाची परिसमाप्ति ज्याप्रमाणे अंतःकरणांत होते, अथवा सर्व कर्मांचे अधिष्ठान हात हेच आहे, अथवा मीठ ज्याप्रमाणे पाण्यांत पूर्णपणे एकरूपता पावते, त्याचप्रमाणे, हे मैत्रेयी, या विश्वरूपाच्या ठिकाणी सर्व विराम पावते. हा विश्वरूप आत्मा अनंत आहे. तो कालस्थलाबाधित आहे. सर्व ज्ञान त्याच्याच ठिकाणी आहे. हे सर्व विश्व त्यापासूनच उदय पावते आणि त्याचा लयही अखेरीस तेथेच होतो. या विश्वात्म्याचा अनुभव आपणास झाला म्हणजे ज्ञान म्हणून निराळे काही शिल्लक उरत नाही व जन्म आणि मरण यांचाही अंत होतो." आपण सारे मूळ रूपाचेच स्फुल्लिंग आहों हा सिद्धांत याज्ञवल्क्यांनी येथे प्रथित केला आहे, हे आपल्या लक्षात आले असेलच. ज्या मूळरूपांतून आपण सारे निघालों आहों त्या रूपाला परत जाण्याचा मार्ग म्हटला म्हणजे त्याला जाणणे हाच होय, हा मुद्दाही याज्ञवल्क्यांनी येथे सांगितला आहे. सध्या एका लहानशा देहांत आपण आपणांस कोंडून घेतले आहे. हा देह म्हणजेच आपण अशी आपली भावना आहे; पण या आपल्या मूळरूपास जाणून त्यांतच आपण प्रवेश केला म्हणजे आपण विश्वरूप होतो. आपलें भ्रमात्मक लहानसें रूप नष्ट होऊन आपण अनंतरूप होतो."
 पतीचे हे भाषण ऐकून मैत्रेयी घाबरली; आणि हेही बरोबरच आहे. अशा प्रकारचे ज्ञान पचविण्यास मनही तसेंच खंबीर लागते. अद्वैतसिद्धांत ऐकल्याबरोबर पळत सुटणारे धीर पुरुष आतांही काही थोडे नाहीत. याज्ञवल्क्यांचे हे भाषण ऐकून मैत्रेयी म्हणाली, " महाराज, आपले भाषण