पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/५१

हे पान प्रमाणित केलेले आहे.

४६ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम

प्रथम जाते त्या वेळी माझ्या चितांत कोणतीही इच्छा नसते. त्या पदार्थाच्या आघाताने माझ्या इंद्रियांवर काहीं विकार संज्ञावाहक ज्ञानतंतूंच्या प्रेरणेनें उत्पन्न होतात. या विकारांना प्रत्युत्तर म्हणून ' अमुक कर ' अथवा ' अमुक करूं नको,' असा विकार माझ्या मेंदूवर येऊन थडकतो. माझ्या अहंकाराचे जे हे परावर्तित रूप ती माझी इच्छा होय. अहंकाराचें जें परावर्तन मेंदूवर पडलें त्या परावर्तनाला इच्छा ही संज्ञा प्राप्त झाली. परावर्तित नव्हे अशा स्वयंरूपाचा एकादा अत्यल्प असा अंशही इच्छा या संज्ञेस पात्र होत नाही. यावरून इच्छा उत्पन्न होण्यापूर्वी दुसऱ्या किती तरी पदार्थांचें अस्तित्व असले पाहिजे हे कोणाच्याही लक्ष्यांत सहज येण्यासारखे आहे. किमानपक्ष अहंकार तरी तिच्या अगोदर अस्तित्वात असलाच पाहिजे. कारण, तसे नसेल तर इच्छा कोणाला होणार ? तिचे अधिष्ठान कोण ? तिचे उत्पत्तिस्थान कोणते ? या प्रश्नांना उत्तर संभवत नाही. ' मी आहे ' ही अस्मिता अथवा सात्विक अहंकाराची भावना अगोदर असेल तेव्हांच ' मी अमुक करावें ' अथवा ' मी अमुक करूं नये ' अशी इच्छा उत्पन्न होऊ शकेल. ' मी आहे ' हीच भावना नष्ट झाली तर इच्छा कोठून आणि कां उद्भवावी ? यावरून इच्छेच्या उत्पत्तीपूर्वी अहंकाराची उत्पत्ति झाली असली पाहिजे हे उघड आहे. अहंकारापासून इच्छा इत्पन्न झाली असून अहंकार त्याहून उच्च अशा महत् पासून निर्माण झाला, आणि महत् म्हणजे बुद्धि हे अव्यक्त प्रकृतीचें एक रूप आहे. आपण जें जें कांहीं पाहतों तें सारे आपल्या इच्छेचेच रूप आहे असें बौद्धांचेंहि मत आहे. सूक्ष्मेंद्रियशास्त्रदृष्ट्या हे मत सर्वथा चुकीचे आहे; कारण इच्छेची उत्पत्ति आणि आपल्या देहांतील संज्ञावाहक ज्ञानतंतु यांचा अत्यंत निकट संबंध आहे; इतका की त्यांचे अस्तित्व नसेल तर इच्छाही उत्पन्न होणार नाही. एखाद्या मनुष्याच्या देहांतून सारे ज्ञानतंतू तुम्ही काढून टाकले तर त्यांच्या नाशाबरोबर त्याच्या इच्छेचाही नाश होईल. चतुष्पादांवर अनेक प्रकारचे प्रयोग करून पाहिल्यानंतर ही गोष्ट आतां निश्चित झाली आहे.
 आतां महत् या वस्तूचे स्वरूप काय आहे याचा विचार करूं. मनुष्याच्या ठिकाणी या वस्तूचें जें रूप प्रकट झाले आहे त्याचा सविस्तर विचार करणे फार अगत्याचे आहे. कारण महत् अथवा बुद्धि हे तत्त्व फार मह-