पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/५४

हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड.] सांख्यविचार. ४९

आपणास नाही. तिच्या पलीकडच्या स्थितीत अस्तित्व म्हणून काही पदार्थ आहे की नाही हेही आपणांस सांगता येत नाही. इतका मुद्दा तुमच्या लक्ष्यांत आला म्हणजे नुकताच सांगितलेला तुमचा प्रश्न अशक्य कोटीतला आहे, ही गोष्टही तुमच्या लक्ष्यांत येईल. एखाद्या मोठ्या जिनसाचा एक अगदी लहानसा तुकडा मी हाती घेतला तर तो क्षुद्र, ओबडधोबड आणि प्रमाणविहीन आहे असेंच मला दिसेल. त्यांतील घटकांत मला विस्कळितपणा आढळेल; आणि असें व्हावें यांत कांहीं नवलही नाही. हीच गोष्ट विश्वासही लागू आहे. हे विश्व अपूर्ण आहे असे आपणांस दिसतें तें कां ? आपण तें अपूर्ण स्थितीतच पाहतो म्हणून. अपूर्ण स्थितीत तें अपूर्ण दिसते हे स्वाभाविक नाही काय ? आपणच तें अपूर्ण स्थितीत पाहातों, हे कसे ? विवेचक बुद्धि आणि ज्ञान यांच्या स्वरूपाचे जे विवेचन नुकतेच झालें तें लक्ष्यांत आणा. ज्ञान म्हणजे वस्तुसंधांतील घटकांचा परस्परसंबंध निश्चित करणे. तुम्ही रस्त्यांत जातां आणि इतक्यांत एखादा मनुष्य तुमच्या नजरेस पडतो. त्याकडे पाहून " हा मनुष्याप्राणी आहे हे मी जाणतो " असें तुम्ही म्हणता. या तुमच्या ज्ञानाचे अथवा जाणण्याचे स्वरूप हेंच की तुमच्या चित्तांत मनुष्याची आकृति पूर्वी हजर असते. तिच्याशी ही नवी प्रतिमा तुम्ही ताडून पाहातां आणि त्याचे साम्य ओळखून या नव्या प्रतिमेला ' मनुष्य ' असें नांव तुम्ही देतां. अनेक माणसें तुम्ही पाहिलेली असतात आणि त्या साऱ्यांच्या प्रतिमा तुमच्या चित्तावर कोरलेल्या असतात; आणि हा नवा मनुष्य पाहता क्षणीच त्याच्याशी सदृश अशा प्रतिमांशी ही प्रतिमा तुम्ही ताडून पाहाता आणि त्यांचे साम्य लक्ष्यांत येतांच तुमच्या चित्ताचे समाधान होऊन " हा मनुष्य प्राणी आहे हे मी जाणलें " असें तुम्ही म्हणतां. साम्य ताडून पाहण्याच्या या क्रियेला ज्ञान असें नांव आपण दिले आहे. तुमच्या चितांत, जणू काय अनेक खण असून त्यांत अनेक चिजा भरल्या आहेत. बाहेरून येणाऱ्या नव्या प्रतिमा या पूर्वीच्या चिजांशी तुम्ही ताडून पाहता आणि या नव्या प्रतिमेची योजना कोणत्या खणांत करावी याचा विचार तुम्ही करतां. ज्ञान होणे या क्रियेचे शास्त्रीय स्वरूप अशा प्रकारचे आहे. यावरून आणखीही एक गोष्ट सिद्ध होते, ती ही की, तुमच्याजवळ अनेक प्रतिमांचा मोठा सांठा अगोदरच तयार अ-स्वा०वि०४-९