पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/७१

हे पान प्रमाणित केलेले आहे.

६६ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम

प्रतिक्रिया यांच्यायोगे पदार्थांच्या परमाणूंत अदलाबदल एकसारखी सुरू आहे. या अदलाबदलीमुळेच सृष्टि आकाराला आली आहे. ही अविरत घडामोड पुरुषाच्या भोगासाठी चालू आहे. सृष्टीचे भोग त्याने भोगावे, तिजपासून काय शिकावयाचे असेल तें त्याने शिकावे आणि मुक्त व्हावें. याकरितांच प्रकृतीने एवढा खेळ मांडला आहे. अगदी क्षुद्रसृष्टीपासून तो थेट देवादि योनीपर्यंत इतकी सोंगे नटविण्याचे काम प्रकृति करीत आहे यांतील मुख्य हेतु हाच की, या साऱ्या वस्तूंचा अनुभव पुरुषाला व्हावा. असा अनुभव त्याने घेतला म्हणजे आपण प्रकृतीच्या मर्यादेत केव्हांच नव्हतों ही खूणगांठ त्याला पटते. प्रकृतीपासून आपण सदोदित निराळे होतो आणि तिचा व आपला कोणताच संबंध नव्हता असें त्याला आढळून येते. त्याचप्रमाणे आपणांत कसलीच घडामोड होत नसून आपण स्वतः अविनाशी आहों हेही त्याला कळू लागते. आपण स्वतः कोठून येत नाही अथवा कोठे जात नाही असा अनुभव त्याला येतो. मरून स्वर्गाला जावें आणि क्षीणपुण्य होऊन पुन्हां मृत्युलोकांत जन्म घ्यावा या घडामोडी प्रकृतीच्या असून आपल्या नव्हत्या असें तो पाहतो. अशा रीतीने पुरुष मुक्त होतो. प्रकृतीने एवढे मोठे नाटक कां रचलें, या प्रश्नाचे थोडक्यांत उत्तर “ पुरुषविमोक्षहेतोः " असें सांख्यशास्त्राने दिले आहे. सृष्टीतील अनंत घडामोडी या एकाच हेतूला धरून चालू आहेत. आपलें अखेरचे साध्य सिद्ध व्हावें याकरितांच हे सारे अनुभव पुरुष घेत असतो, आणि हे अखेरचें साध्य म्हणजे मुक्ति हेच होय. सांख्यतत्त्वज्ञांच्या मताप्रमाणे पुरुष अनंत आहेत. विश्वाचा उत्पन्नकर्ता अशा स्वरूपाचा कोणी परमेश्वर म्हणून अस्तिस्वांत नाही असाही श्रीकपिलांचा सिद्धांत आहे. विश्वांत ज्या अनेक घडामोडी प्रत्यहीं अनुभवास येतात त्या साऱ्या घडवून आणण्यास प्रकृति एकटीच समर्थ आहे, यामुळे आणखी एखादा परमेश्वर म्हणून कोणी आहे व तो सृष्टि उत्पन्न करतो असे मानण्याचे कारण नाहीं असेंही कपिलांचे म्हणणे आहे. तुमच्या साऱ्या प्रश्नांची योग्य वासलात लावण्यास प्रकृति समर्थ आहे असे सिद्ध झाल्यावर निराळ्या परमेश्वराची आवश्यकता कोठे राहिली ?

 येथवर सांख्यशास्त्राचे मत ग्रहण करून वेदान्ताने आपला पुढील मार्ग आक्रमण्यास सुरवात केली आहे. पुरुष अथवा आत्मा हा सत्, चित् आणि