पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/७४

हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] सांख्य आणि वेदांत.६९

माझ्या ठिकाणी जाणीव म्हणून जे काही आहे ते तीन प्रकारच्या स्वरूपाचे आहे असें वेदान्ताचे मत आहे. ही तीन रूपें सत् , चित् आणि आनंद ही होत. मला कशाचीही गरज नाही, मी शांत आहे, स्वस्थ आहे, माझ्या शांतीचा भंग कोणीही करू शकत नाही अशा प्रकारचे कल्पनातरंग आपल्या चित्तांत कधीमधी वावरतांना आढळतात. अशा प्रकारची 'मी गरजेच्या पलीकडचा आहे' ही भावनाच आपल्या जीवनाचा पाया आहे. आपल्या साऱ्या जीवनाचा मध्यवर्ती बिंदु हाच असून याभोंवतीं आपल्या एकंदर जीवनक्रमाचे रहाटगाडगें चालू आहे. ही भावना मर्यादित झाली म्हणजे इतर वस्तूंशी ती मिश्र होते आणि अमूर्तातून मूर्तरूपाला येते. सत् , चित् आणि आनंद ही त्रिविध भावना मूळ अरूप असते आणि तीच पुढे प्रत्यक्षत्वास येते. हीच भावना अस्तित्वरूप, ज्ञानरूप आणि प्रेमरूप धारण करते. प्रत्येकाला अस्तित्व आहे. सत् या अव्यक्त स्वरूपाचें हें व्यक्तरूप आहे. प्रत्येकाला ज्ञान आहे.चित् या अव्यक्त रूपाचें ज्ञान व्यक्तरूप आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या ठिकाणी प्रेम आहे. हे आनंदरूपाचें व्यक्तरूप होय. ज्याच्या अंतःकरणांत प्रेमाचा लेश नाही असा प्राणी तुम्हांस आढळावयाचा नाही. तें व्यक्तरूपाने दिसण्याचे मार्ग आणि परिस्थिति ही भिन्न असतील; तथापि प्रेमशून्य असा प्राणी एकही नाही. कोठे तरी तें व्यक्त करण्यावांचून त्याला गत्यंतरच नाही. अत्यंत क्षुद्र कीटकापासून तो थेट देवाधिदेवापर्यंत प्रेमाची व्याप्ति सर्वत्र आहे. अंतःसृष्टीच्या ज्या स्वयंभू रूपाला 'य' ही संज्ञा आपण दिली होती त्यालाच सच्चिदानंद अशी संज्ञा वेदान्ताने दिली आहे; आणि याच मूळरूपाशी मनाचे मिश्रण झाले म्हणजे तें अस्तित्व ज्ञान आणि प्रेम या रूपाने दिसू लागते. मूळचें सच्चिदानंद रूप अमर्याद आणि स्वयंभू आहे. कोणत्याही दोन पदार्थांच्या मिश्रणानें तें बनलेले नाही. त्याचप्रमाणे त्या रूपांत कधी बदलही होत नाही. तें स्वयमेव असल्यामुळे दुसऱ्या पदार्थाची क्रिया त्याजवर घडू शकत नाही. आत्मरूप तें हेच. हेच आत्मरूप मनाशी मिश्र झाले की ते मर्यादित होऊन त्यालाच आपण व्यक्ति असे म्हणतों. हेच रूप सृष्टीत अनेक रूपांनी व्यक्तदशेला आलेले असते. कोठे झाडझुडुप या रूपाने तर दुसऱ्या कोठें कीटकाच्या रूपाने आणि तिसऱ्या ठिकाणी मनुष्याच्या रूपाने हेच आत्मरूप व्यक्तपणास येतें. ज्याप्रमाणे हे महदाकाश कोठे घटाच्या तर