पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/७५

हे पान प्रमाणित केलेले आहे.

७० स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवमः

कोठे मठाच्या उपाधीमुळे मर्यादित होऊन घटाकाश, मठाकाश, इत्यादि अनेक आकाशांस जन्म देते, त्याचप्रमाणे आत्मरूप निरनिराळ्या देहांच्या उपाधीने अनेकविध भासू लागून स्वतःस कोठे झाड तर कोठे कीटक आणि कोठे मनुष्य म्हणवू लागते. ज्ञानाचें जें रूप व्यवहारांत आपणांस दिसतें तें त्याचे खरें अथवा मूलरूप नव्हे. अंतज्ञान हे ज्ञानाचे मूलरूप नव्हे. त्याचप्रमाणे उपजतबुद्धि अथवा विवेचकबुद्धि हेही ज्ञानाचें मूलरूप नव्हे. हे मूलरूप स्वपदभ्रष्ट होऊन दुसऱ्या कोणत्या तरी पदार्थाशी मिश्र झाले म्हणजे त्याला अंतर्ज्ञान असे आपण म्हणू लागतो. हीच त्याची भ्रष्टता अधिक वाढली म्हणजे तेंच विवेचकबुद्धि हे नांव घेतें आणि येथूनही ते अधिक खाली गेलें म्हणजे तेंच उपजतबुद्धि या संज्ञेस पात्र होते. त्या मूलस्वरूपाच्या ज्ञानाला 'विज्ञान' अशी संज्ञा वेदान्ताने दिली आहे. विज्ञान म्हणजे उपजतबुद्धि नव्हे आणि अंतर्ज्ञानही नव्हे. विज्ञान या शब्दाचा अधिक खुलासा करावयाचाच असला तर सर्वज्ञता या शब्दाने बरेचसे काम होईल. विज्ञानाला मर्यादा नाही. त्याची गति अमुक ठिकाणापर्यंतच आहे आणि त्यापलीकडे ती नाही असे नाही. त्याचप्रमाणे त्यांत कशाचे मिश्रणही नाही. तें स्वयंभू आहे. आनंद हे रूपही अशाच प्रकारचे आहे. मूळचे आनंदरूप मिश्र आणि मर्यादित झाले म्हणजे आपण त्याला प्रेम असें म्हणतों. अव्यक्त आणि अमर्याद आनंद एकाच देहाशी, एकाच मनाशी अथवा विशिष्ट कल्पनांशी संयोग पावला म्हणजे त्या त्या उपाधींनी तो मर्यादित व मिश्ररूप होऊन व्यक्त दशेला येतो आणि त्याच्या या स्वरूपांत आपण त्याला प्रेम या नांवानेओळखतो. मूळ आनंदरूपाचे हे भ्रष्ट रूप मात्र आहे. सत्, चित् आणि आनंद हे आत्म्याचे गुण नव्हत हे अगोदर सांगितलेच आहे. आत्मा आणि सच्चिदानंद ही दोन एकरूपच आहेत. हे दोन पदार्थ अविभाज्य आहेत. या दोहोंत कोणत्याही प्रकारचा स्वरूपभेद नाही. सत्, चित् आणि आनंद मिळून आत्मा होतो असें म्हणा अथवा आत्म्यांतून सत्, चित् आणि आनंद निघतात असें म्हणा. मुद्दा इतकाच की या दोहोंत गुणधर्ममूलक अथवा परिमाणमूलक असा कोणत्याही प्रकारचा भेद नाही. मूळ वस्तु एकच असून आपण त्रिविध प्रकारांनी ती एकच वस्तु पाहत असतो. सच्चिदानंद हे रूप अपरोक्ष आहे. ते सापेक्ष ज्ञानापलीकडचे रूप आहे. तेंच अनंत अपरोक्ष