पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/८१

हे पान प्रमाणित केलेले आहे.

७६ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम

विश्वांतील झाडेझुडपं आणि खनिज पदार्थसुद्धा तुम्हीच आहां. प्रत्येक वस्तूचें व्यक्तरूप तें तुम्हीच. ज्याला ज्याला अस्तित्व हा शब्द लावतां येतो तें सारें तुम्हीच आहा. तुम्ही अनंतरूप आहां. अनंताचे भाग पाडता येणे शक्य नाही. त्याला भाग असणे अशक्य आहे; कारण त्याचा भाग केला तरी तो भागही अनंतच होईल. तो अनंत झाला तर मूलवस्तु आणि तिचा भाग ही सारखींच होतील. सबंध वस्तु आणि तिचा भागही एकच आहेत हे म्हणणे बुद्धिग्राह्य नाही. याकरितां तुम्ही या अनंतवस्तूचे भाग आहो असे म्हणणे अथवा तुम्ही ' अमुक राजश्री ' इतक्याच अल्परूपाचे आहां असें म्हणणे वेडे पणाचे आहे. हे म्हणणे वस्तुस्थितीस सोडून आहे. असे कोणी बोलला तर तें तो स्वप्नांत बोलत आहे असे तुम्ही समजा. हे सर्व जाणून घ्या, याचा अनुभव घ्या आणि मुक्त व्हा. साऱ्या अद्वैत वेदान्ताचा हा अखेरचा सिद्धांत आहे. ' मनोबुद्धयहंकारचित्तानि नाहम् । न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे । न च व्योम भूमिर्न तजो न वायुः। चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥ ' हेच खरें ज्ञान. याखेरीज बाकी जे राहिले तें सारें अज्ञान. ज्ञान आणि मी अशा दोन भिन्न वस्तूंना अस्तित्व नाही; कारण मी ज्ञानरूप आहे. मला जीवितही नाहीं; कारण मी जीवितच आहे. मी सर्वत्र आहे--मी अस्तित्व आहे, मी एकरूप आहे. माझ्याशिवाय वेगळे अस्तित्व कोणालाही असणे शक्य नाही. सर्व भूतजात मजमध्येच आहे. सर्व भूतजात मीच आहे. सर्व भूतांच्याद्वारे मी स्पष्टत्वास येतों; तथापि त्यांच्या पाशांत मात्र मी नाही. मी मुक्त आहे. मला मुक्तीचीही जरूर नाही. मुक्तीची वाट कोण शोधतो ? बद्ध असेल तो. जो बद्ध नाही त्याला मुक्तिही नको. ' मी बद्ध आहे ' अशी भावना तुम्ही केली की त्याच क्षणी तुम्ही बद्ध होता आणि मग तसेच बद्ध राहता. तुम्हाला बांधणारे जाळे तुम्हीच आपल्या हाताने विणतां. ' शिवोहम् ' हा अनुभव एकवार तुम्हाला आला की त्याच क्षणी तुम्ही मुक्त होता. ज्ञान म्हणतात तें यालाच. ही पराविद्या. ही मुक्तिदात्री विद्या आहे. “ हे बोलाचे नव्हे शास्त्र। पै संसारजिणते शस्त्र । आत्मा अवतरविते मंत्र ! अक्षरें इयें। " मुक्त होणे हेच साऱ्या सृष्टीचे अखेरचे साध्य आहे.