पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/८९

हे पान प्रमाणित केलेले आहे.

८४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम्

पाहतां अमक्याचा आत्मा अधिक दर्जाचा आणि दुसऱ्या एखाद्याचा आत्मा क्षुद्र, असे म्हणणे म्हणजे अर्थशून्य बडबड करणेच होय. केवळ आत्म दृष्टीने पाहतां पशहून अथवा वृक्षादिकांहून मनुष्य प्राणी अधिक श्रेष्ठ आहे, हे म्हणणे अशास्त्र, अयथार्थ, आणि अर्थहीन आहे. वस्तुतः सर्व विश्व एकरूपच आहे. आत्मस्वरूपाच्या स्पष्टीभवनाच्या मार्गात झाड ही एक मोठी धोंड आड पडली आहे. चतुष्पाद जनावर ही अडचण त्याहून कमी आहे आणि मनुष्यप्राणी ही अडचण या दोहोंपेक्षाही कमी आहे. सुसंस्कृत आणि सुविद्य मनुष्यांत तर ही अडचण फारच थोडी असते आणि पूर्णत्व पावलेल्या मनुष्यांत ही अडचण मुळीच नसते. आपल्या इंद्रियांच्या द्वारें जी जी कर्मे आपण करीत असतो, त्या साऱ्यांच्या पोटी एकच हेतु असतो. तो हेतु हाच की आत्मरूपावरील हा पडदा दूर व्हावा. ज्या लहानशा छिद्राच्या द्वारें आत्मरूपाचा अंशतः प्रत्यय आपणांस येतो तें छिद्र मोठे करण्याकरितांच ही सारी धडपड आहे. बाह्य आकार आणि त्या मागील सत्यवस्तू यांजमध्ये असलेल्या पडद्याचे पदर एकामागून एक नाहीसे व्हावे या हेतूनेच आपण आपली सारी कसे करीत असतो; आणि अशा रीतीने कर्मे करीत असतां कांहीं वेळां परमावधीचे दुःख आपणास भोगावे लागते, तर कित्येक वेळां सुखसागरांत आपण पोहत असतो. आज हंसावें आणि उद्या रडावें, परवां विचारमन स्थितीत मूकवृत्ति धारण करून बसावें, तर तेरवां एकसारखी बडबडच करीत सुटावें हा आपला चालू आयुष्यक्रम आहे. या साऱ्या कृतींचें अंतिम पर्यवसान हा पडदा फाटण्याकडे व्हावें इतकाच आपला वास्तविक हेतु आहे. आत्म्याला मुक्त करावें हा आपल्या कर्माचा हेतु नाही; कारण तो मुक्तच आहे. आपल्या कर्माचा हेतु त्यावरील पडदा दूर करणे हा आहे. तो पडदा दूर झाला म्हणजे आत्मा स्वयमेव मुक्त आहे असा अनुभव होतो. ज्या जाळ्यांत तो सांपडला आहे तें तोडण्याचा आपला हेतु आहे. सूर्याच्या समोर आलेले ढग नाहीसे करावे हे वायूचे काम आहे. सूर्याला प्रकाशमय करण्याचे काम त्याचे नाही. कारण सूर्य स्वयंप्रकाश आहे त्याजवर आलेला ढगांचा पडदा वाऱ्याने उडवून दिला की प्रकाश आपोआपच फांकतो. सूर्यावरील ढगांचा पडदा जो जो अधिक पातळ होत जातो, तो तो त्याच्या प्रकाशाचा प्रत्यय अधिकाधिक स्पष्ट होत जातो.