पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/९

हे पान प्रमाणित केलेले आहे.

४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम

खरे वाटत असते. मन स्वतः स्वप्नमय असतें तोपर्यंत स्वप्नालाही सत्यत्व असते; पण तें जागृत होऊन पाहूं लागतांच स्वप्न अदृश्य होते. मग स्वप्न आपल्या हाती कधीच सांपडत नाही. असें कां ? स्वप्न खोटे नव्हते. स्वप्नाचें अस्तित्व त्याच्या चालू काळी खरेंच होते. मग ते आपल्या हाती कां सांपडूं नये ? याचे कारण हेच की त्याचे अस्तित्व आपल्या बुद्धीच्या कक्षेबाहेरचें आहे. आपल्या आटोकाट विवेचकबुद्धीची हद्द जेथे संपते तेथेच स्वप्नाची हद्द लागते. यामुळे आपल्या बुद्धीच्या आटोक्यात त्याला आणणे आपणास शक्यच नाही. आपल्या या जीवितांतील प्रत्येक वस्तु अशाच अफाट स्वरूपाची आहे. वस्तुजाताच्या विस्तारापुढे आपल्या बुद्धीची मातब्बरी कांहींच नाही. यामुळे बुद्धीने सांगितलेल्या कायद्याच्या मर्यादेंत हे वस्तुजात केव्हांच येत नाही. बुद्धीचा हुकूम तें धुडकावून लावीत असते. त्याच्याभोंवतीं आपल्या कायद्याचे जाळे पसरण्यासाठी बुद्धि धडपडत असते आणि तिच्या या धडपडीकडे पाहून तें वस्तुजात हंसत असते. हा बाह्य वस्तुजाताचा नियम मानवी आत्म्याच्या ठिकाणी हजारपटीने अधिक खरा आहे. ' मी कोण ?' हे या सर्व चराचर सृष्टींतले मोठयांतले मोठे कोडें आहे.
 हे कोडे किती आश्चर्यजनक आहे पहा ! नुसत्या डोळ्याचेच उदाहरण घ्या. डोळ्याइतकें नाजुक इंद्रिय दुसरे नाही. क्षणार्धात त्याचा नाश लीलेनें करता येईल; तथापि अत्यंत प्रचंड अशा सूर्याचे अस्तित्व त्याच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. डोळा आहे म्हणून सूर्य आहे. जग आहे अशी खातरजमा देण्यास तुमचा डोळा आहे म्हणूनच जगाला अस्तित्व आहे. हा चमत्कार काय आहे याचा क्षणभर विचार करा. डोळा तो केवढासा आणि त्याचा प्रभाव किती ! एखादी लहानशी टांचणी अथवा प्रकाशाचा किरण त्याचा नाश करूं शकेल. तथापि सूर्यासारख्या प्रचंड वस्तूचे अस्तित्व त्याजवर अवलंबून आहे ! जगांतील अत्यंत चमत्कारिक वस्तूंचे अस्तित्व या दोन चिमुकल्या डोळ्यांवर अवलंबून आहे. हे म्हणतात, “ हे प्रकृति, तुला दृश्य अस्तित्व आहे. " एवढे यांनी म्हटलें पुरे की प्रकृतीचे अस्तित्व आपण निमूटपणे कबूल करतो. हीच गोष्ट आपल्या साऱ्या इंद्रियांनाही लागू आहे.
 हा सारा प्रकार आहे तरी काय ? यांत दुर्बल कोण आणि बलवान् तरी कोण ? मोठे कोण आणि क्षुद्र कोण ? विश्वांतील अवघ्या वस्तू परस्परावलंबी