पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/९८

हे पान प्रमाणित केलेले आहे.

खंड ] वेदांत व हक्क. ९३

ईश्वर आणि सैतान अथवा अहुरमझ्द आणि अहरिमन या पुष्कळ अंशाने कविकल्पना आहेत. ईश्वर आणि सैतान यांच्यातील वास्तविक फरक म्हटला म्हणजे एक परार्थ आणि दुसरा स्वार्थ इतकाच होय. सैतानालाही परमेश्वराप्रमाणेच ज्ञान आहे आणि त्याच्या इतकें सामर्थ्यही सैतानाला आहे. फरक इतकाच की परमेश्वराचे पावित्र्य त्याच्या ठिकाणी नाही, आणि एवढयामुळेच तो सैतान झाला. आता हेच माप सांप्रतच्या जगाला लावून पहा,ज्ञान आणि सामर्थ्य यांची अतिरिक्त वाढ आणि त्याबरोबरच पवित्रतेचा अभाव अशी साधनें मनुष्याच्या ठिकाणी एकत्र झाली म्हणजे त्याचा सैतान बनण्यास काय उशीर? यांत्रिक कल्पनेची विलक्षण वाढ सांप्रत काळी झाली आहे. यामुळे मनुष्याच्या सामर्थ्यांतही कल्पनातीत वाढ झाली आहे, पण या वाढीबरोबर पवित्रतेची कांही वाढ झाली आहे काय ? ती झाली नसल्यामुळे सध्यां मनुष्यप्राणी अरेराव बनून नाना प्रकारचे हक्क गाजवू लागला आहे. प्राचीन काळी स्वतःच्या सामर्थ्याचा हक्क मनुष्याने इतक्या क्रूरतेने कधीही गाजविला नसेल. यामुळेच हे हक्कांचे खूळ मोडण्याची आवश्यकता वेदान्ताला आज जितकी वाटत आहे, तितकी ती पूर्वी कधीही वाटली नाही. मनुष्यांच्या देहाचेच नव्हे तर, जणूं काय, आत्म्याचेही मरण ओढवलें आहे असे सध्या वाढू लागते.
 तुम्हांपैकी गीतेचा अभ्यास ज्यांनी केला असेल त्यांना ही वचनें या प्रसंगी अवश्य आठवतील:-

विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।
शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः ॥
इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः ।
निर्दोष हि समं ब्रह्म तस्माद्ब्रह्मणि ते स्थितः॥

(भ. गी. ५.)

 वेदान्तमताने प्रतिपादिलेल्या साऱ्या नीतिशास्त्राचे सार या दोनच श्लोकांत सांठविलें आहे असे म्हणण्यास हरकत नाही. सर्वत्र साम्यावस्था पाहावयाची यांतच साऱ्या नीतीचा अंतर्भाव होतो. कर्त्याच्या क्रियेस अनुसरून जड जगांतील घडामोडी होत असतात हे आपणांस ठाऊक आहेच. कर्ता हाच शास्ता असून जड जग हे शासित आहे. कर्त्यात बदल झाला की जड