पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/१५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४०
हिंदुसमाज- संघटना आणि विघटना
 

सम्राटांनी नर्मदेच्या उत्तरेकडच्या दिल्लीच्या सलतनतीचा उच्छेद करण्याचा कधी संकल्पही केला नाही. तिकडे त्यांनी कधी पाऊलही टाकले नाही. आणि बहामनी शाखांपैकी सर्वच किंवा एखादी तरी उखडून टाकून तेथे हिंदुसत्ता प्रस्थापित करण्याची आकांक्षाही त्यांनी कधी धरली नाही.
 अखिल भारतातून मुस्लीमसत्तेची पाळेमुळे खणून काढण्यात मराठ्यांना यश आले याचे एक कारण हे की प्रारंभापासून त्यांचा संकल्पच तसा होता. पंधराव्या वर्षीच शिवछत्रपती 'हिंदवी स्वराज्याचे' स्वप्न पाहात होते आणि छत्रपतींपासून पाटिलबाबांपर्यंतच्या दीडशे वर्षांच्या काळात प्रत्येक मराठ्याच्या मनापुढे हिंदुपदपातशाहीचे हेच भव्य स्वप्न सारखे उभे होते. दिल्ली सर करावयाची आहे, रूमशामपर्यंत जावयाचे आहे, अवनिमंडल निर्यवन करावयाचे आहे हाच मराठ्यांना ध्यास होता. या भव्य आकांक्षेमुळेच त्यांना अटकेपासून म्हैसुरपर्यंत आणि अहमदाबादेपासून जगन्नाथपुरीपर्यंत मराठा साम्राज्याची प्रस्थापना करता आली. आपला प्रारंभापासूनचा हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी त्यांनी सामर्थ्य संघटना कशी केली, संघटनतत्त्व कोणते अवलंबिले, त्यावरील निष्ठा कशा जोपासल्या हे आता पाहावयाचे आहे; पण हे पाहण्याआधी जरा पूर्व- इतिहासाचे अवलोकन करणे अवश्य आहे. मराठ्यांच्या या स्वराज्य- स्थापनेच्या उद्योगाला प्रारंभ झाला तो सतराव्या शतकाच्या मध्याला, छत्रपतींचा उदय झाला तेव्हा. त्याच्या आधी महाराष्ट्र तीनशे-साडेतीनशे वर्षे पारतंत्र्यात होता. १२९६ सालीच अल्लाउद्दिनाने देवगिरीच्या रामदेवरावाला मांडलिक करून टाकले होते. मग तेथपासून शिवोदय होईपर्यंत एवढ्या प्रदीर्घकाळात मराठे काय करीत होते हे पाहणे उद्बोधक ठरेल. विजयनगरच्या धुरीणांनी पारतंत्र्य आल्यावर पंचवीस-तीस वर्षांतच ते नष्ट केले व स्वराज्याची स्थापना केली. मग हीच गोष्ट महाराष्ट्रात मराठ्यांना का शक्य झाली नाही हे पाहिल्यावाचून पुढे जाणे युक्त ठरणार नाही.

दुबळी बहामनीसत्ता :
 मदुरेला स्थापन झालेल्या मुस्लीम सत्तेपेक्षा कलबुर्ग्याला हसन गंगू याने स्थापिलेली बहामनी सत्ता जास्त प्रबळ होती असे मुळीच नाही. मागल्या प्रकरणात सांगितलेली एकंदर मुस्लीम सत्तांच्या ठायीची सर्व भेदकारणे, सर्व विघटन