पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रस्तावना : ७

तत्त्वज्ञान स्वातंत्र्योत्तरकाळात प्रभावी होऊन आपली लोकसत्ता दृढ व बलाढ्य होईल अशी साहजिकच सर्वांची अपेक्षा होती. पण त्या अपेक्षेचा भंग झाला आणि पुन्हा आपली लोकशाही, आपले स्वातंत्र्य, आपली संस्कृती, आपली अस्मिता यांचे रक्षण करण्यास आपण अजूनही असमर्थच आहो, असे घोर दृष्य दिसू लागले. असे का झाले याची चर्चा या आठव्या प्रकरणाच्या उत्तरार्धात करून ही भयानक आपत्ती टाळण्यासाठी भारतातील तरुणांनी कोणत्या उपायांचा अवलंब केला पाहिजे, कोणत्या मार्गांनी गेले पाहिजे याचे विवेचन शेवटी केले आहे. पाश्चात्त्य मिशनऱ्यांच्या पद्धतीने भारतीय बहुजनात मिसळून राहून प्रथम शास्त्रीपंडितांच्या विकृत धर्माचे संस्कार जनतेच्या मनावरून पुसून टाकले पाहिजेत व राममोहन राय, रानडे, टिळक, आगरकर, दयानंद, विवेकानंद, सावरकर, महात्माजी यांनी प्रारंभिलेली सर्वागीण क्रान्ती पूर्ण केली पाहिजे, हा एकच उन्नतीचा उपाय आहे, हा एकच मार्ग आहे. आजचा विद्यार्थी सध्याच्या परिस्थितीमुळे संतप्त झाला आहे आणि तो जाळपोळ, विध्वंस या मार्गाने जात आहे. त्याने हे ध्यानात ठेवावे की टिळक, आगरकर, महात्माजी असेच संतप्त झाले होते; पण त्यांनी आपला संताप लोकजागृतीच्या रूपाने व्यक्त केला आणि त्यांत ब्रिटिशांच्या साम्राज्याची आहुती दिली. आजच्या विद्यार्थ्यांनी त्या थोर पुरुषांच्या मार्गाने जाऊन अपुरी सामाजिक, धार्मिक क्रान्ती पुरी करून पुन्हा लोकशक्ती निर्माण केली पाहिजे. येथे लोकसत्ता आली; पण तिची जबाबदारी घेण्यास समर्थ असे 'लोक'च येथे नाहीत. येथील जनता अजून सतराव्या अठराव्या शतकातच आहे. तिला जागृत, संघटित करून विसाव्या शतकात आणणे ही जबाबदारी विद्यापीठांतील विद्यार्थ्यांची आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे यासाठी लक्ष तरुणांची एक संघटना उभारणे अवश्य आहे. आजच्या संतप्त विद्यार्थ्यांनी विवेकनिष्ठा जागृत ठेवून अशी संघटना उभारली तर भारताचे भवितव्य उजळण्याचे सामर्थ्य त्यांना सहज प्राप्त होईल.
 हा प्रबंध तयार करताना मला अनेकांचे साह्य झाले आहे. माझे मित्र श्री. गं. म. साठे व प्रा. चं. शं. बरवे यांच्याकडे प्रकरण तयार झाल्यावर ते वाचण्याचे व त्यावर चर्चा करण्याचे काम होते. प्रत्येक प्रकरण त्यांच्या दृष्टिकोणातून पाहून झाल्यानंतरच मी 'वसंत' कडे धाडीत असे. त्यांच्या या परिश्रमामुळे मला माझे लेखन दुरून पाहता आले. 'वसन्त' चे संपादक श्री.