पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/10

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३) ठेवले पाहिजे. ऐतिहासिक घडामोडींचे गुणदोष विवेनात्मक किंवा विकास विवेचनात्मक वर्णन इतिहासकाराने कितीहि विस्ताराने केले तरी समकालीन साधनांच्या अभावी त्यांत अपूर्णता राहील. कार्यकारणमीमांसेचे बौद्धिक आकलन होणे हा इतिहासाच्या अभ्यासाचा एक भाग झाला. परंतु ऐतिहासिक घटनेचे संस्कार मनावर उमटण्यास तत्कालीन साधनांच्या द्वारें मनाने भूतकालांत प्रवेश केला पाहिजे. रामायणाचे ऐतिहासिक महत्त्व व तत्कालीन लोकस्थिति यासंबंधी कितीहि अभ्यासपूर्ण विवेचन केले तरी ऋषिपत्नी अनुसूया सीतेची वेणी घालीत असतां सीतेने आपल्या स्वयंवराचे वर्णन अनुसयेस ऐकवलें, नंतर ' अनुसयेने प्रेमपूर्वक दिलेल्या अलंकारांनीं भूषित झालेल्या सीतेला अवलोकन करून रामाला हर्ष झाला. ' हें आश्रमांतील वर्णन वाचकांच्या मनावर जो ठसा उमटवील तो पृष्ठेच्या पृष्ठे केलेल्या विद्वत्ताप्रचुर विवेचनानेंहि उमटणार नाहीं. रडणारे लहान मूल गप्प करण्यास एकादे वेळीं मानसशास्त्रज्ञ असमर्थ ठरेल पण एकाद्या परक-या मुलीला तें सहज साधेल. ऐतिहासिक घटना ही जशी प्रौढपणाने तशी बालमनाने आकलनं करणें अवश्य आहे. मराठे व इंग्रज यांच्यामधील लढाईत मराठे कां हरले याचे समतोल विवेचन ' मराठे व इंग्रज' या ग्रंथांत सांपडेल. पण प्रस्तुत पुस्तकांतील ' मराठे-इंग्रज सेनापतींची भेट ' हा उतारा वाचणारास त्या मीमांसेतील मानवी घटना (human aspect) लक्षांत आल्यावाचून राहणार नाहीं. ' मराठे स्वारीवर देखील शकून अपशकून मानीत' या वाक्यापेक्षां • लॉर्ड कॉर्नवॉलिसने मराठ्यांचे सरदारांस विनंति केली की, उद्या सकाळी आपण येथून तळ हालवू.' त्यावर मराठ्यांनी उत्तर केलें कीं, * ही आज्ञा आम्ही आनंदाने मानली असती पण आठ दिवस जेथे मुक्काम केला तेथून नवव्या दिवशी हलणे हे अशुभ व धर्माचाराच्या विरुद्ध आहे. म्हणून आमचा निरुपाय आहे. त्यांच्या या भ्रामक समजुतीला लॉर्ड कॉर्नवॉलिसने मान दिला व आपला बेत पुढे ढकलला. हा उतारा वाचकाच्या मनावर स्पष्ट संस्कार करू शकतो. पानिपतवर मराठ्यांच्या झालेल्या हालअपेष्टेचे व पळापळीचे यथार्थ वर्णन नाना फडणीसाच्या आत्मचरित्रांतून वाचल्यावर ज्यांचे चित्त हेलावणार नाही असा वाचक विरळा.