पान:हिंदुस्थानातील दुष्काळ.pdf/102

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रॉयल कमिशनचा रिपोर्ट वाचून त्यांत सुचविलेल्या गोष्टी अमलांत आणण्याचा प्रयत्न करावा. उपसंहार. आतापर्यंत आमच्या देशांत दुष्काळ पडण्याची कारणे काय व त्या प्रत्येकाच्या निवारणार्थ सरकारची व लोकांची कर्तव्ये कोणती, याचे विवेचन बऱ्याच विस्ताराने करण्याचा प्रयत्न केला. सध्या आमच्या देशांत बरीच गमागमाची साधनें अनुकूल असल्यामुळे, येथे जर लोकांजवळ धान्य किंवा संपत्ति यांचा संग्रह असता, तर अशा एकाद दुसऱ्या अवर्षणाने आमच्यावर सध्यांसारखा माणसास माणसाने खाण्याचा, आईने मुलासह जीव देण्याचा, बापाने हाल पाहवत नाहीत म्हणून जिवंतपणीच मुलांस मातीआड करण्याचा आणि जिवंत माणसांस कोल्ह्याकुत्र्यांनी खाण्याचा भयंकर प्रसंग कधीही आला नसता. पूर्वी इ. स. १३९६ पासून बारा वर्षे महाराष्ट्रांत ज्या वेळी दुर्गादेवीचा दुष्काळ पडला, त्या वेळी आगगाडया आगबोटी सारखी साधनें नव्हती, तरी लोकांमध्ये काही नाण होते. सगळेच लोक शेतकरी बनले नव्हते. त्यांच्यामध्ये उद्यमवैचित्र्य होते. त्यांची धान्याची पेवें भरलेली असत, आणि सरकार धारे गल्लयामध्ये असल्यामुळे, शेतकऱ्यांस चांगली सवड मिळून सरकाराजवळही पुष्कळ गल्ला शिलकी असे.