पान:हिंदुस्थान आणि ब्रिटिश वसाहती.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५ )

इंग्रजी पुस्तकाच्या बऱ्याच भागाचें भाषांतर माझे परलोकवासी बंधु ती. रा. रा. रामचंद्र वासुदेव नाटेकर ह्यांनी केलें होतें; राहिलेल्या भागाचें भाषांतर *माझ्या हातून झाले आहे. आधीं मराठी भाषेत उप- युक्त पुस्तकांची उणीव; व तशांतहि जीं थोडी बहुत होतात त्यांना वाचकांची उणीव. पुस्तकांची उणीव नाहींशी व्हावी म्हणून आपल्या युनिव्हर्सिटीचे व्हाइस चान्सेलर डा. रामकृष्ण गोपाळ भांडारकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली थोडयाच दिवसांपूर्वी "डेक्कन व्हर्नाक्युलर सोसायटी " नांवाची संस्था स्थापित झाली आहे. वाचकांची उणीव नाहीशी होण्याचा सुदिन कधीं येईल तो येवो. कित्येक विद्वानांनी ह्या पुस्तकाचा हस्तलेख वाचून व कित्येकांनी ह्याचे प्रूफ वाचून जे अभिप्राय दिले ते पुस्तकाच्या शेवटीं छापिले आहेत. ह्या सर्वांचे व ज्या दुसऱ्या कित्येक मित्रांनीं उपयुक्त सूचना केल्या त्यांचे अत्यन्त आभार मानितों.

२६. वि. वा. नाटेकर. } हेडा नं. २. ठाणे. ता. ११२/९५.