पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/25

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुसलमान जातीच्या विद्यार्थ्यास शिकण्याची मोकळीक असल्यामुळे मुसलमान बांधवांची अनेक मुले शिकत आहेत. आलीकडे पुण्यांतील न्यू इंग्लिश स्कुलास नवीन सुधारणेच्या अनेक सोईंनी परिपूर्ण असें एक बोर्डिंग जोडलें आहे. त्यांत देखील मुसलमान विद्यार्थ्यास प्रतिबंध नाही. ह्मणून मुसलमान जातीचे अनेक विद्यार्थी तेथे जाऊन रहातात, आणि मोठ्या आनंदाने विद्याभ्यास करितात. हे मुसलमान बांधवांनी मुद्दाम जाऊन पहावें झणजे 'चक्षुर्वैसत्यं' याप्रमाणे त्यांची खात्री होईल. बडोद्यांत गायकवाड सरकाराकडून दानधर्म फार होतो, तेथे दररोज हिंदु लोकांस खिचडी (कोरडा शिधा) मिळते. त्याचप्रमाणे मुसलमान जातीच्या लोकांस शिजविलेल्या अन्नाचा धर्म दररोज मिळतो. त्याखेरीज प्रत्येक एकादशीच्या दिवशी मुसलमान जातीच्या लोकांस दरमाणशी नक्त चार आणे मिळतात. त्यास 'ग्यारमी' असें ह्मणतात. हा मुसलमानांस मिळणारा धर्मादाय कैलासवासी खंडेराव महाराजांनी चालू केला, तो अद्याप अखंड चालत आहे. मकेंतील मुसलमान धर्माच्या कबरेवर ठेवण्याकरितां १० लक्ष रुपये किंमतीची रत्नजडित चादर खंडेराव महाराजांनी तयार करविली होती, ती तयार झाल्यावर खंडेराव महाराज अकस्मात् वारले. यामुळे पुढे ती मकेस गेली की नाही हे कळत नाही. तथापि, मुसलमान लोकांविषयी व त्यांच्या देवस्थानांविषयीं हिंदु लोकांत भक्तिभाव किती आहे हे या गोष्टीवरून स्पष्ट दिसून येईल. हे उदाहरण आमच्या प्रियकर मुसलमान बांधवांनी अत्यंत विचार करण्यासारखे आहे.