पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/20

हे पान प्रमाणित केलेले आहे.



एथे हिंवाळ्यांत बर्फ नेहमीं पडते व कधी कधी तर बरेच खोल

पडते; परंतु वसंत ऋतु लागतांच ते वितळून जाते. समशीतोष्ण देशांतील वनस्पति एथे जास्त आढळतात. तथापि, पूर्वी सांगितलेल्या कारणांमुळे उष्ण कटिबंधांत उत्पन्न होणारी झाडे जितक्या उच्च प्रदेशावर उगवण्याचा संभव असतो त्यापेक्षा अधिक उच्च प्रदेशावर हीं उगवलेली आढळतात; व थंड हवेत होणाच्या वनस्पति ह्याच झाडांमध्ये संमिश्र होऊन उगवतात. परंतु शीत व उप्ण ह्यांचा कडाका फारच असल्यामुळे उष्ण कटिबंधांत उगवणारी झाडे चांगली वाढत नाहींत. ताड, माड वगैरे हिंदुस्तानांत होणारी झाडे ह्या ठिकाणी आढळत नाहींत. सर्व झाडझाडोरा युरोपखंडाप्रमाणे दिसतो.

 तिसरा व सर्वांत उंच पट्टाः- हा दुसऱ्या पट्टयापासून हिमालयाच्या शिखरांपर्यंत समजावयाचा. एथील हवा युरोप व अमेरिका खंडाच्या अगदी उत्तरेकडील भागाप्रमाणे आहे, व शेवटी अगदीं शीतकटिबंधांतल्या हवेप्रमाणे आहे, म्हणजे एथे सतत बर्फ असते. मे व जून ह्या महिन्यांमध्ये हिंवाळ्याची कडक थंडी नाहीशी होऊन एकाएकी अतिशय उन्हाळा भासतो. ह्या वेळीं असा चमत्कार दृष्टीस पडतो की, ह्या प्रदेशामध्ये आपण प्रवास करूं लागलों असतां, वरून सूर्याचे किरण इतके तीक्ष्ण भासतात तरी त्यामुळे हवेतील थंडाव्यामध्ये फरक न होतां उष्णतामापक यंत्रामध्ये पाहतां पारा ० अंशाच्या खाली कित्येक अंश असतो. ह्याचे कारण असे की, सूर्याच्या किरणांपासून जी उष्णता प्राप्त होते ती सर्व