पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/27

हे पान प्रमाणित केलेले आहे.



१४

मध्ये थंडीचे मान जितकें कमी असेल त्याच प्रमाणानं वार्षिक सरासरी उष्णतेचे मान कमी असते. ह्याचे उलट, उन्हाळ्यांतील व हिंवाळ्यांतील उष्णतेचे मान जितकें जितके जवळ जवळ असेल, तितकें तितके सरासरी वार्षिक उष्णतेचे मान जास्त होते. ह्यावरून सरासरी वार्षिक उष्णतेचे मान कमी असले तरी त्या ठिकाणी उन्हाळा कमी असतो, असे समजू नये. उदाहरणार्थ असे घेऊ कीं, एके ठिकाणी उन्हाळ्याच्या उष्णतेचे मान १०० अंश आहे; व त्याच ठिकाणी हिंवाळ्यामध्ये उष्णतेचे मान ६० अंश आहे. तेव्हां ह्या ठिकाणचे सरासरी वार्षिक उष्णतेचे मान ८० अंश झाले. आतां, दुसरें एक ठिकाण आहे, तेथे उन्हाळ्यांत उष्णता ९०° असते; व हिंवाळ्यांत उष्णता ८०° असते, अशी कल्पना करू. ह्या ठिकाणीं वर्षाचे सरासरी मान ८५° होते. आतां, ह्या दुसऱ्या ठिकाणी सरासरी वर्षाचे उष्णतेचे मान जरी अधिक आहे, तरी पहिल्या ठिकाणी उन्हाळा विशेष कडक आहे. ह्यावरून हे उघड होते की, वार्षिक उष्णतेचे मान सांगितले असतां, तेथील उन्हाळ्यांतील उष्णतेचे प्रखरतेची कल्पना नेहमी बरोबर करितां येते, असे होत नाहीं.

 उत्तर हिंदुस्तानांत वार्षिक उष्णतेचे सरासरी मान जरी दक्षिणेपेक्षा कमी आहे तरी हा प्रदेश सखल असल्या कारणाने म्हणजे समुद्राचे पृष्ठभागापासून ह्याची उंची फारशी नसल्या कारणानें, तसेच मे व जून महिन्यांमध्ये एथे सूर्याचे किरण अधिक लंब रेषेनें पडत असल्या कारणाने उन्हाळा फार होतो. विशेषतः वायव्य