पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/38

हे पान प्रमाणित केलेले आहे.



२५

दृष्टीस पडावयाचा नाहीं. ह्या कालांत जे पाणी जमिनीवर पडेल

त्यावरच वर्षभर निर्वाह व्हावयाचा; नद्या, ओढे, ओहोळ, विहिरी तलाव यांस ह्या पाण्यापासून पुरवठा व्हावयाचा; व ह्याच पाण्याने मनुष्यांस, जनावरांस, झाडांस वगैरे पाणी मिळावयाचे. पाण्यावांचून मनुष्यांस व जनावरांस दोन चार दिवस सुद्धां राहतां यावयाचें नाहीं. उष्ण देशामध्ये मनुष्यांस व जनावरांस प्यावयासही पाणी पुष्कळ लागते.

 पुष्कळ वेळां असे होते की, मुंबई इलाख्यांतील नगर, सोलापूर, विजापूर वगैरे जिल्ह्यांत पाण्याचा दुष्काळ पडतो, म्हणजे गुदस्त सालीं पाऊस चांगला पडल्यामुळे लोकांजवळ धान्याचा व गुरांकरितां चाऱ्याचा सांठा चांगला असूनही चालू साली पाऊस चांगला न पडल्यामुळे पाण्याचा पुरवठा कमी पडतो, व लोकांस आपले घरदार सोडून देशोधडीस जावे लागते. थोडेबहुत पाणी असेपावेतों मनुष्ये कसा तरी टिकाव धरून राहतात. अशा वेळी जनावरांस पाणी न मिळाल्यामुळे ती हळू हळू मरावयास लागतात; व पावसाने अखेरपर्यंत अशीच अवकृपा केली म्हणजे शेवटीं मनुष्यांसही देश सोडून जावे लागते. अशा रीतीने जनावरांची नासाडी झाली म्हणजे मग पुढे पाऊस पडूनही सर्व जमीन लागवड होत नाहीं; जी जमीन लागवड होते तिची मेहनतही चांगली होत नाहीं. लोकही जे निकृष्ट दशेस आलेले असतात ते पुढे पाऊस चांगला पडत गेला तरी लौकर सुधारत नाहींत. एकपक्षी