पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/43

हे पान प्रमाणित केलेले आहे.



३०

पणांस सूर्याचे किरणांपासून मिळालेली उष्णता कमी करण्यास उपाय योजिले पाहिजेत. उष्णता कमी करण्याचे कार्य झाडे तीन रीतींनीं करितात : आपल्या अंगच्या रंगानें, रसायनव्यापाराने व बाष्पीभवनाने.

रंग.

 झाडांचा रंग काळसर म्हणजे हिरवट काळा असतो. आणि काळा रंग उष्णताग्राहक आहे. सूर्याच्या धवल तेजामध्ये सात रंगांचीं किरणे आहेत. ह्या सात रंगांचे मिश्रणापासून किरणास धवलता प्राप्त झाली आहे.

 पदार्थ जो आपणांस दिसतो त्याचे कारण त्यावर प्रकाशाचीं किरणे पडून त्या किरणांचे परावर्तन होऊन ती किरणें आपल्या डोळ्यांवर येऊन आपटतात हे होय. ह्यावरून, प्रकाश नसला तर आपणांस पदार्थ मुळीच दिसावयाचे नाहींत. आपण उजेडांत जरी असलों तरी पदार्थावर उजेड पडला नाहीं तर तो आपणांस दिसावयाचा नाहीं.

 आतां, दुसरा प्रश्न असा उद्भवतो कीं, पदार्थांवर धवल किरणें पडली असतां ते आपणांस निरनिराळ्या रंगाचे कां दिसतात ? तर याचे कारण असे की, प्रत्येक पदार्थाच्या अंगीं त्यावर जीं प्रकाशाची किरणें पडतात त्यांतील सप्त रंगांपैकी एक अगर अधिक रंग गिळून टाकून बाकीचे रंग परावर्तन करण्याचा धर्म असतो. तांबडे जे पदार्थ दिसतात, ते तांबड्या रंगाची किरणे खेरीजकरून बाकीच्या सर्व रंगांची किरणें गिळून तांबडी तेवढी मात्र किरणें परा-