पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/49

हे पान प्रमाणित केलेले आहे.



३६

दुधामध्ये बेताचे विरजण पडले म्हणजे दुधाचे दहीं लौकर होऊ लागते, व ज्या भांड्यांत ते दहीं असते ते बरेच गरम होते. ह्याचे कारण दुधाचे दहीं होणे ही एक रसायनसंयोगक्रिया आहे व त्यामुळे उष्णता उत्पन्न होते. अशी दुसरी अनेक उदाहरणे सांगता येतील. ह्यावरून रसायनसंयोगापासून उष्णता उत्पन्न होते हे स्पष्ट झाले.

 ह्याच्याच उलट म्हणजे एका पदार्थाचे रसायन पृथक्करण करणे झाल्यास म्हणजे तो पदार्थ ज्या मूळ दोन अगर अधिक द्रव्यांपासून झाला असेल ती द्रव्ये निरनिराळी काढणे झाल्यास त्यास उष्णता दिली पाहिजे. चुनकळी व पाणी यांचे संयोगापासून जो चुना उत्पन्न झालेला असता त्या चुन्यापासून पुनः चुनकळी व पाणी हे निरनिराळे करावयाचे झाल्यास त्यांपासून पूर्वी प्राप्त झालेली उष्णता त्यांस पुनः परत दिली पाहिजे. ह्याचप्रमाणे, लाकूड अगर तेल आणि ऑक्सिजन यांपासून जो कार्बनिक आसिड नांवाचा वायु तयार होतो त्या वायूपासून पुनः ऑक्सिजन आणि तेल किंवा लाकूड पृथक् पृथक् करणे झाल्यास पूर्वी उत्पन्न झालेली उप्णता त्यास दिली पाहिजे. अशी दुसरीही पुष्कळ उदाहरणे आहेत. वरील सर्व उदाहरणांवरून हे सिद्ध होते की, दोन पदार्थांचा रसायनसंयोग होऊ लागला असतां उष्णता उत्पन्न होऊ लागते; व ह्याचेच उलट ह्मणजे रसायनपृथक्करण करणे झाल्यास उष्णता खर्च करावी लागते. ज्या ठिकाणीं रसायनपृथक्करण आपोआप होते त्या ठिकाणी आजूबाजूस असलेली उप्णता नाहीशी होते. उष्णता नाहीशी होणे म्हणजे थंडी उत्पन्न होणे.