पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/8

हे पान प्रमाणित केलेले आहे.

श्यक आहे. ह्या विषयाची वाटाघाट होऊन झाडांचे वृद्धीची

अवश्यकता जितकी लोकांचे मनांत बिंबेल तितके आपल्या देशाचे कल्याण आहे. हे पुस्तक वाचून ज्यांना ज्यांना म्हणून मालकीची जमीन आहे, त्यांना त्यांना आपल्या जमिनीवर झाडे लावावी अशी इच्छा उत्पन्न झाल्यास, मी आपल्या श्रमाचे सार्थक्य झाले असे समजेन.

 ह्या बाबतीत सरकारही आपले कर्तव्य करीत आहे. झाडांची वृद्धि करण्याकरितां, आणि जी झाडे आहेत त्यांचे संरक्षण करण्याकरितां सरकाराने जंगलखात्याची योजना केली आहे. ह्या खात्याचा उद्देश फार स्तुत्य आहे. आणि सरकारचे हेतु योग्य रीतीने सिद्धीस गेल्यास आपल्या देशाचा फार फायदा होण्याचा संभव आहे. असे असून ह्या खात्यासंबंधाने लोकांचे अज्ञान फार आहे व त्यांचा गैरसमजही फार झालेला आहे. ह्यामुळे जंगलखाते हें सरकारने आपल्या कल्याणाकरितां काढिले आहे असे लोकांस न वाटतां, ते ह्या खात्यास जितका अडथळा करवेल तितका करीत आहेत. हा गैरसमज दूर करण्याबद्दल यथाशक्ते प्रयत्न करावा हाही हे पुस्तक लिहिण्याचा हेतु आहे.

 ह्या पुस्तकाचा विषय शास्त्रीय असल्यामुळे हे पुस्तक सर्वांस सारखें समजण्याचा संभव कमी. अर्वाचीन मुख्य मुख्य शास्त्रांची मूलतत्त्वें ज्यांस अवगत आहेत त्यांस हे पुस्तक सहज समजेल. ज्यांचा मराठी सातवे इयत्तेपर्यंत अभ्यास झाला आहे व क्रमिक पुस्तकांतील शास्त्रीय विषयांवरील धडे ज्यांनी लक्षपूर्वक वाचले आहेत, त्यांस हा विषय समजण्यास हरकत पडेल असे वाटत नाही. साधारण समजुतीच्या मनुष्याससुद्धां हा विषय समजावा ह्या हेतूनें, ज्या ठिकाणी शास्त्रीय तत्त्वे सांगण्याचा प्रसंग आला आहे, त्या ठिकाणी ती तत्वें प्रचारांतील अगदी साधी उदाहरणे देऊन स्पष्ट व सुबोध करण्याचा विशेषतः प्रयत्न केला आहे. ज्यांत यंत्रोपकरणाची जरूर आहे असे शास्त्रीय प्रयोग सांगण्याचे होईल तितकें