पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/80

हे पान प्रमाणित केलेले आहे.



६७

हवेमध्ये सोडण्याची क्रिया झाडे सदोदीत करीत असतात. म्हणून ज्या ज्या ठिकाणी झाडांचा समूह जास्त, त्या त्या ठिकाणी हवेमध्ये वाफेचा संचयही जास्त. म्हणून असल्या ठिकाणावरून अशा प्रकारची हवा जाऊ लागली म्हणजे पुष्कळच पाऊस पडला पाहिजे. कारण, एक तर झाडांच्या योगाने तेथे थंडी जास्त असते. व दुसरे, झाडांच्या योगाने त्या ठिकाणी वाफही हवेमध्ये पुष्कळ उत्पन्न झालेली असते. म्हणून पाऊस पड़ण्यास लागणारी जी दोन अवश्यक कारणे, ती दोन्हीही झाडांपासून मिळतात. असलेले स्थान जास्त उंच करणे हे आपल्या आधीन नाहीं. परंतु, त्याच स्थानावर असलेली झाडे कायम ठेवणे किंवा नसतील तेथे ती लावणे, हे आपल्या आधीन आहे. एकादें स्थान उंच करण्याची जरी आपणांमध्ये शक्ति असती, तरी देखील तें स्थान उंच करण्याचे भरीस न पडतां, त्या ठिकाणी झाडे लावणे हेच उत्तम झाले असते. कारण, जमीन उंच केल्याने फक्त थंडीच उत्पन्न होते; परंतु, झाडे लावण्याने थंडी उत्पन्न होऊन आणखी वाफही उत्पन्न होते. ह्यावरून, पाऊस पडण्यास झाडांपासून किती साहाय्य होते, हे स्पष्ट झाले.

पर्जन्यव्याप्ति

 आतां, हिंदुस्तानांत निरनिराळ्या ठिकाणी किती पाऊस पडतो, व त्या ठिकाणीं तितका कां पडतो, ह्याविषयी थोडेसे विवरण करू.