पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/122

हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्पष्ट शब्दांत केलेला आहे. फेब्रुवारी १९४८ नंतर तर कम्युनिस्टांनी हैदराबादच्या स्वातंत्र्याला पाठिंबा दिल्यामुळे ते व काँग्रेस शत्रूच झाले होते. पोलिस अॅक्शननंतर कम्युनिस्ट उठाव दडपून टाकण्यासाठी स्वामीजी व काँग्रेसने सर्वतोपरी साहाय्य केले. तरीही सोयीस्कररीत्या स्वामीजींवर छुपे कम्युनिस्ट असल्याचा शिक्का अनेक जणांनी मारून पाहिला. त्यांत मुनशी हे एक.

 स्वामीजींना छुपे कम्युनिस्ट म्हणण्याचे कारण भाई गोविंददास श्रॉफ हे होते. गोविंदभाई नेहमीच मार्क्सवादी म्हणून ओळखले गेले. ते मार्क्सवादी होते व आहेत. त्यांनी नेहमीच मार्क्सवादाचा पुरस्कार केला. पण ते कडवे राष्ट्रवादी असल्यामुळे त्यांचे व कम्युनिस्टांचे कधी जुळले नाही. १९४२ नंतर कधीही ते कम्युनिस्ट पक्षाचे सभासद नव्हते. ह्यापूर्वी तरी रीतसर पक्षाचे सभासद ते होते की नाही कोण जाणे. लोकशाही प्रेम, राष्ट्रवाद, गांधी नेहरूंचे गाढ आकर्षण असणारे गोविंदभाई कधी कम्युनिस्ट होऊही शकणार नाहीत. गोविंदभाई स्टेट काँग्रेसचे सरचिटणीस व हैदराबाद मुक्ती आंदोलनाची जी कृतिसमिती होती तिचेही सरचिटणीस होते.

 आता सारेच संपले आहे. हैदराबादच्या आंदोलनातील बहुतेक प्रमुख पात्रे आता काळाच्या पडद्याआड गेली आहेत. तरीही हे सारे एकदा लिहिणे आवश्यक होते. कारण हैदराबादचा जवळून परिचय नसणारा माणूस मुनशींच्या पुस्तकाचा आधार घेतो. त्यामुळे एकदा एजंट जनरल होते तरी कसे हे सांगणे भाग पडते.

***

(प्रथम प्रकाशन : सोबत दिवाळी अंक १९७२)

हैदराबाद-विमोचन आशि विसर्जन /१२१