पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/124

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे. पण एकतर त्यांच्यासमोर सर्व संस्थाने होती, एकटे हैदराबाद नव्हते आणि दुसरे म्हणजे केंद्र सरकारचे संस्थान खाते आणि हैदराबाद इतक्यापुरतेच ते लिहीत होते. हैदराबादच्या जनतेने चालविलेल्या आंदोलनाविषयी मेनन यांना काही सोयरसुतक नव्हते. हैदराबाद प्रकरणाविषयी कन्हैयालाल मुन्शी यांनीही एक पुस्तक 'End of an Era' म्हणून लिहिलेले आहे. पण त्यात प्रामाणिक वृत्तांत कथनाखेरीज इतरच बाबी जास्त आहेत. कै. नबाब अलियावर जंग बहादूर यांनीही हैदराबादविषयी एक पुस्तक लिहिलेले आहे. पण त्या पुस्तकात पोलिस अॅक्शन होईपावेतो आपली भूमिका काय राहिली या गोष्टीबाबत त्यांंनी मौन पाळलेले आहे. हैदराबादच्या जनतेचे आंदोलन, हैदराबादेतील मुसलमानांची इत्तेहादुल मुसलमीन व तिचे मित्र यांचे राजकारण, हैदराबादेतील शासन आणि भारताचे केंद्रीय शासन या सर्व घटकांचा एकत्रित विचार करणारे साधार व तपशीलवार पुस्तक उपलब्ध नाही, ही गोष्ट खरी आहे. कै.स्वामी रामानंद तीर्थ यांनी आपले आत्मवृत्त लिहिले आहे पण प्रत्येक ठिकाणी संन्याशाने स्वतःविषयी बोलावे काय? आत्मस्तुती करावी काय? याविषयीचा संकोच त्यांना नडत गेला. हैदराबादेत पोलिस अॅक्शन सप्टेंबर १९४८ साली झाले. या घटनेला अजून पुरते वर्षही झाले नव्हते, तर आंदोलनात अग्रभागी असणाऱ्या कार्यकर्त्यांचा एक मोठा गट काँग्रेसमधून बाहेर पडला. हैदराबादचे आंदोलन हे मोठ्या प्रमाणात सशस्त्र आंदोलन होते. या सशस्त्र आंदोलनाची अधिकृत जबाबदारीही काँग्रेस संघटनेने घेतलेली होती. काँग्रेसने अधिकृतरीत्या सशस्त्र आंदोलनाची जबाबदारी स्वीकारण्याचा योग फक्त हैदराबादेत आला. जे या मुद्द्यावर बोलू इच्छित होते त्यांना बोलण्यासाठी वातावरण अनुकूल नव्हते. उरलेल्यांना जुन्या आठवणी सांगायच्या नव्हत्या. या लेखात ज्या साठ-चाळिशीच्या तहाचा उल्लेख येणार आहे त्याला मान्यता देणारे रामकृष्णराव पुढे हैदराबादचे मुख्यमंत्री झाले. हैदराबादच्या आंदोलनाला स्वातंत्र्यलढा म्हणून मान्यता अगदी परवा परवा म्हणजे १९७२ साली मिळाली. तोवेळपर्यंत सर्व घटना जुन्या झालेल्या होत्या. आमच्या देशातील अभ्यासकांना हैदराबादच्या आंदोलनाचे महत्त्व कधी मनापासून पटले नाही. म्हणून हैदराबादचा तपशीलवार इतिहास कुठे लिहिलेला आढळत नाही. याबद्दल इतर कुणाला दोषी धरण्यापेक्षा आम्ही आम्हालाच दोषी गृहीत धरणे अधिक चांगले होईल. कारण शेवटी ही जबाबदारी आमची होती, आम्हाला ती नीटपणे पार पाडता आली नाही.

 या लेखात इतर प्रश्नांच्याविषयी काही बोलण्याऐवजी हैदराबादच्या राजकारणातील

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१२३