पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/143

हे पान प्रमाणित केलेले आहे.

लढो की मुसलमानांच्या विरुद्ध लढो, सशस्त्र लढो की निःशस्त्र लढो, आंदोलनग्रस्त कृतिमग्न हिंदू समाजाचे नेतृत्व भारतात कुठेच हिंदुमहासभेला घेता आले नाही. कारणे कोणतीही असोत, सत्य हे असेच आहे.

 हैदराबादच्या आंदोलनात अजून एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की, ब्रिटिश इंडियात मुसलमानांची एक समजूत अशी होती की, भारत मुसलमानांच्या हातून इंग्रजांनी जिंकून घेतलेला आहे. म्हणून मुसलमान इंग्रजांच्या विरुद्ध लढणे भाग आहे. सुशिक्षित मुसलमान पुरेसे धर्मप्रेम असणारे होते. ते इंग्रजांच्या विरुद्ध आंदोलन न करता डावपेचांच्या राजकारणातून पाकिस्तान मिळविण्याच्या प्रयत्नात होते. बहुसंख्य मुसलमानांचा पाठिंबा ह्या गटाला होता. ह्यांचे नेते जीना होते. पण वास्तवाचे भान नसणाऱ्या कर्मठ, धर्मवेड्या मुसलमानांचा इंग्रजी राजवटीला विरोध होता. ते हिंदूंच्या सहकार्याने लढू इच्छीत होते. ह्या गटाला आपण त्या काळी राष्ट्रवादी मुसलमान म्हणत असू. अपवाद वगळता बहुतेक राष्ट्रवादी मुसलमानांच्या डोक्यात इंग्रज निघून गेल्यानंतर भारतावर इस्लामी वर्चस्व स्थापन करण्याचे स्वप्न रुजलेले असे. हैदराबादेत परिस्थिती त्याहून निराळी होती. हैदराबाद संस्थानात काँग्रेसच्या राजकारणात असणारा मुसलमान जाणीवपूर्वक एक मुसलमानी राज्य समाप्त करण्यास वचनबद्ध झालेला होता. मुसलमानांचे राजकीय वर्चस्व आणि मुसलमानांचे धार्मिक वर्चस्व दोन्हीही उद्ध्वस्त करण्याची मनाने तयारी करायची आणि त्या बेबंद राजवटीत ह्या स्वप्नासाठी आत्मबलिदान करायला तयार व्हायचे, असे ह्या कार्यकर्त्यांचे स्वरूप आहे. भारतातील राष्ट्रवादी मुसलमानांच्याबरोबर ह्या शंभर टक्के खऱ्या लोकशाहीने राष्ट्रवादाने भारलेल्या देशभक्तांची तुलना न करता नेहमीच ती आपल्याला भगतसिंह, चंद्रशेखर, आझाद इ. क्रांतिकारकांच्या रांगेत करावी लागेल. ह्या थोर देशभक्तांना आपण अजून न्याय दिलेला नाही. त्यांच्यातील प्रमुख दोन नावे नोंदविणे इथे भाग आहे. एक हुतात्मा शोईब उल्लाखान हे होते. ज्यांची कथा ह्या संग्रहात आलेली आहे. मला त्यांच्याइतकेच दुसरे नेते कै. सिराज उल हसन तिरमिजी हे दिसतात. तिरमिजी आमच्या शेवटच्या जनता आंदोलनाला आरंभ होण्याच्या पूर्वी काही महिने आकस्मिकपणे वारले. ज्या काँग्रेसच्या अधिवेशनाने जनता आंदोलनाची घोषणा केली त्या अधिवेशनाला ह्या नेत्याचे नाव देण्यात आले होते.

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१४५