पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/16

हे पान प्रमाणित केलेले आहे.

होते, हे नोंदविणे महत्त्वाचे ठरते. त्यात हे गृहस्थ होते, ते कसे वागले, का वागले, हा प्रश्न वेगळा. पण कुरुंदकरांनी आपल्या विवेचनात उत्तरकालीन घटनांवर भर दिल्यामुळे संबंधित असा नजीकच्या इतिहास व व्यक्ती यांच्यावरही अन्याय होऊ नये म्हणून एक उदाहरण दिले एवढेच. लक्षात घ्यावयाचा भाग असा की १९३८ पूर्वीच्या हैदराबादचा इतिहास हे एक उद्योगपर्व होते. १९३८ ते १९४६ हे आंदोलन पर्व होते. १९४६ ते ४८ हे प्रक्षोभपर्व होते. प्रक्षोभपर्वाच्या शेवटच्या अंशाला मुक्तिपर्व म्हणण्यास अडचण पडू नये. या महाभारतातील प्रत्येक पर्व हे एकात एक अडकलेले होते. उभ्या आडव्या धाग्यांनी आठ घटकांचा निर्देश मागे आला आहेच. या उभ्या आडव्या धाग्यांचा इतिहास व त्याचा पट मोठा आहे व रोमहर्षकही आहे. या उभ्या आडव्या पटतंतूवर कुरुंदकरांनी मोठे मार्मिक विवरण या ग्रंथात केलेले आढळेल.

 या घटकात कुरुंदकरांची लक्ष्यवेध झालेली व्यक्ती म्हणजे निझाम. निझाम म्हणजे सातवे निझाम मीर उस्मानअलीखां वयाच्या २५ व्या वर्षी १९११ ला तक्तनशीन झाले व शेवटपर्यंत त्यांनी आपल्या राज्याची सूत्रे आपल्या हातात ठेवली. त्या व्यक्तिमत्त्वाच्या आकलनाच्या आवश्यकतेवर कुरुंदकरांनी खूप भर दिला आहे. निझामाचे व्यक्तिमत्त्व हे बहुरंगी व बहुढंगी. आपला पिता महबूबअलीखां याच्यापेक्षा संपूर्णतः निराळे, गहन, गूढ, संमिश्र व अत्यंत महत्त्वाकांक्षी व पाताळयंत्री देखील. ह्या महत्त्वाकांक्षी स्वभावरचनेत हैदराबादच्या पारंपारिक इतिहासाची काही सूत्रे होती व तीच त्याने प्रभावीपणे रेटण्याचा प्रयत्न केला. त्यांपैकी महत्त्वाचे सूत्र म्हणजे हैदराबाद हे स्वतंत्र राज्य व्हावे ही आकांक्षा-इतिहासकाळातील वेळोवेळी इंग्रज सरकारशी झालेल्या व्यवहाराने, करारमदाराने ही स्वतंत्र राजवटीची कल्पना सीमित झालेली होती, हे खरे. या आकांक्षेचे व्यावहारिक प्रतिबिंब म्हणजे वऱ्हाडाचा प्रश्न. वऱ्हाड हा हैदराबादला भिडलेला भाग. तो निझामच्या हातून १९ व्या शतकाच्या मध्यावर. इंग्रजांनी तैनाती फौजेच्या खर्चासाठी घेतला व पुन्हा काही परत केला नाही. त्या वेळचे निझामचे पंतप्रधान चंदुलाल यांची ती कर्तबगारी (?). त्यानंतर उद्भवले १८५७ चे युद्ध. त्या वेळी निझामाने इंग्रजांना खूप मदत केली व त्याच्या मोबदल्यात हा प्रांत परत मागितला. केवळ या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी पहिले सालार जंग १८७६ ला इंग्लंडला जाऊन आले, पण व्यर्थ! नंतर या बाबतीतला दुसरा महत्त्वाचा प्रयत्न झाला तो म्हणजे १९०२ मध्ये. त्या वेळी ६ मार्च १९०२ त्या वेळचे व्हाईसराय लॉर्ड कर्झन स्वतः हैदराबादेत आले होते व त्यांनी आपल्या व मीर महबूब अलीखांच्या भेटीत अक्षरश: दादागिरी करून त्यांनी विशिष्ट पद्धतीने वऱ्हाड इंग्रजांकडे राहण्याच्या .