पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/166

हे पान प्रमाणित केलेले आहे.

इतिहासात विजयातून राज्ये निर्माण झाल्याची शेकडो उदाहरणे आहेत. सतत पराभवातून स्वतंत्र राज्य अस्तित्वात आल्याचे तुरळक उदाहरण निजामचे संस्थान हे एक आहे. कधीही विजय झाला नाही हे याचे वैशिष्ट्ये. मराठ्यांबरोबरची पहिली लढाई : हार. दुसरी : हार. तिसरी : हार. असे जे सतराशे तेवीस-चौवीसपासून चालले ते सतराशे ब्याण्णवपर्यंत. सर्व मोठ्या लढ्यांत निजामाची हार. प्रमुख हारीत सतराशे चोवीसची तालखेड, सतराशे सदतीसची भोपाळ, सतराशे सत्तावनची उदगीर, सतराशे बासष्टच्या सुमारास राक्षसभुवनची पहिली, सतराशे ऐंशीला दुसरी, सतराशे ब्याण्णवला खर्ड्याची, अशा या प्रमुख लढ्यांत निजामाचा पराभव. फ्रेंच व इंग्रज यांच्याशी याच्या जेवढ्या लढाया झाल्या त्यात याचा पराभव. एकट्या इंग्रजांशी लढाया झाल्या त्यात पराभव. टिपू सुलतानाशी याच्या जेवढ्या लढाया झाल्या त्यात याचा पराभव. प्रत्येक लढाईत सातत्याने पराभव होऊनही हैदराबादचे राज्य मात्र स्थिर झाले. विजयी झाला असता तर तो कदाचित सुभेदारच राहिला असता. तो सतत पराभवातून स्वतंत्र राजा झाला. पराभवातूनही राज्याची निर्मिती करणारा हा चाणाक्ष महापुरुष चिनकुलीझखान. या चिनकुलीझखानाच्या गादीवर आलेला सातवा पुरुष म्हणजे उस्मानअली. * याला मीर अलीखांबहादुर, आसफदौला, आसफजहा या पदव्या होत्याच पण आधीच्या कुणालाही नसलेल्या दोन पदव्या याने स्वतःला लावून घेतलेल्या होत्या. त्या म्हणजे अरस्तू-ए-जहा व रुस्तुम-ए-जहा. अरस्तू म्हणजे अॅरिस्टॉटल, म्हणजे महान बुद्धिवान. रुस्तुम म्हणजे महान शौर्यवान. यापैकी हा रुस्तुम-ए-जहा होता की नाही हे सांगता येत नाही, पण आपल्या बुद्धीचा प्रभाव मात्र त्याने बराच दाखविला.

 निजामाच्या कुळात एक काळजी घेण्याचा उपदेश पिढ्यानपिढ्या चालत आला आहे. उस्मान अलीखां बहाद्दूरपर्यंत सर्वांनी ही काळजी घेतलेली आहे. ही काळजी


 *१. पहिला निजाम कमरुद्दीनखान १७२४ - १७६२
  २. दुसरा निजाम अली १७६२ - १८०३
 •३. तिसरा नबाब सिकंदर जहाँ १८०३ - १८२९
  ४. चौथा नबाव नासिरौद्दौला १८२९ - १८५७
  ५.पाचवा नबाब अफझुलौद्दौला १८५७ - १८६९
  ६. सहावा नवाव महबूब अलीखां १८६९ - १९११

  ७. सातवा नबाब उस्मान अलीखां १९११ - १९४७ मृत्यू १९६८

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१६८