पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/176

हे पान प्रमाणित केलेले आहे.

खापर्डे म्हणजे कविभूषण असणारे खापर्डे नव्हेत. त्यांचे वडील बंधू टिळकांचे सहकारी खापर्डे नव्हेत. हे जे बाबासाहेब खापर्डे होते ते हैदराबादचे वतनदार असल्यामुळे त्यांची एक गोष्ट सांगतो. निजामाच्या कालगणनेप्रमाणे 'बावीस अजूर' हा दिवस आझादे रियासती हैदराबाद म्हणून सर्व हैदराबादमध्ये सुटीचा असे. ही सुटी इंग्रजी तारखेने ऑक्टोबरच्या मध्याच्या सुमारास यावयाची. या सुटीला बाबासाहेब खापर्डे आपल्या गढीवर झेंडा लावीत. तो त्यांनी सत्तेचाळीस साली भारताच्या स्वातंत्र्यानंतरही लावला. नंतर यावर गोळीबारापर्यंत पाळी आली. पंजाबराव देशमुखांचे मत होते की निजामाला वऱ्हाड परत मिळाला पाहिजे. ब्रिजलाल बियाणी यांचेही असेच मत होते. म्हणून निजामाने अकोल्याच्या बाबूराव देशमुख वाचनालयाला इमारत व जागा यासाठी दहा हजार रुपये, शिवाजी शिक्षण संस्थेला काही एकर जागा व इमारती बांधायला तीस हजार रुपये, असे पैसे देणगी म्हणून दिलेले आहेत.

 चालू असणाऱ्या मुद्दयाचे अवधान आपणाला असेलच, या वेळी आपण निजामाच्या उदारतेचा विचार करीत नाही. त्याला हिज मॅजेस्टी पदवी लावावयास व्हाइसरॉयने नकार दिल्यावर त्याने संस्थानातील व बाहेरच्याही जनतेत स्वतःसाठी मतकक्ष बांधावयास सुरुवात केली हे आपण पाहात आहोत. हा मतकक्ष ऐनवेळी निजामाला कसा उपयोगी पडला व आंदोलनाच्या कसा पायात अडमडला याचे एक उदाहरण सांगतो. एकोणचाळीस साली वंदेमातरम् सत्याग्रह झाला. त्या सत्याग्रहात अनेक तरुण मुलांनी भाग घेतला. यांच्या शिक्षणाचा संबंध उस्मानिया विद्यापीठाशी होता. ते त्यांना सोडावे लागले. सत्याग्रहाचा भाग म्हणून त्यांनी त्याच्यावर बहिष्कारच टाकला. त्यांच्या मनात होते, मुसलमान राजाशी लढून मुसलमान विद्यापीठावर बहिष्कार टाकीत आहोत. साहजिकच हिंदू विद्यापीठ आपले हात पसरून स्वागत करणार, म्हणून ते बनारसला मालवीयांच्या हिंदू विद्यापीठाकडे गेले. तर त्या विद्यापीठाने स्वतःचे दरवाजे या विद्यार्थ्यांना बंद केले. कारण मदनमोहन मालवीयांच्या हिंदू विद्यापीठाला निजामाची एक लाखांची देणगी पोहोचली होती. हे चिक्कू माणसाचे चित्र नसून चौरस विचार करणाऱ्या धूर्त माणसाचे चित्र आहे. पैशाने मिंधे हिंदू विद्यापीठ मुसलमान राजाच्या पाठीशी राहिले. त्याने हिंदू आंदोलनाचा पाय ओढला. मतकक्ष (Lobby) उपयोगी पडतो तो अशा रीतीने पडतो.

 निजामाने त्याची या संदर्भातील भूमिकाही नीट बांधलेली होती. हैदराबाद हे

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१७८