पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/187

हे पान प्रमाणित केलेले आहे.

म्हणायचेच असेल तर निजामाला सोशियालिस्ट सुद्धा म्हणता येईल. याचे कारण असे की निजामाने जे कारखाने वाढविले ते सर्व सरकारी मालकीत होते. त्यामुळे साराच पब्लिक सेक्टर होता. प्रायव्हेट सेक्टर निपजूच द्यायचा नाही व निपजला तर वाढू द्यायचा नाही ही त्याची भूमिका होती. त्यामुळे कापड गिरण्या राष्ट्रीय करण्याची गरजच नाही; साखर कारखाने राष्ट्रीय करण्याची गरजच नाही. कागदाच्या गिरण्या, कोळशाच्या खाणी, रेल्वे जे जे काही आहे ते सारे सरकारी. म्हणजे पब्लिक सेक्टरचे धोरण निजामाने फार प्रामाणिकपणे अंमलात आणले होते. पण यातला अधेलाही जनतेच्या कल्याणासाठी खर्चिला जाणार नाही यावर निजामाची नजर असे. निजामाची बुद्धिमत्ता पाहायला पाहिजे. त्याचे कर्तृत्व पाहायला पाहिजे. त्याचप्रमाणे त्याचा पाताळयंत्रीपणा आणि जनताद्रोही दुष्ट वृत्तीही समजून घेतली पाहिजे. निजामाचा अभ्यास म्हणजे मित्राचा अभ्यास नव्हे; शत्रूचा अभ्यास आहे. ही जी संपूर्ण रचना आहे त्याला निजामाची काही सूत्रे होती. आझादे हैदराबाद या नावाची एक सुटी सुरू केली. संपूर्ण राज्यकारभाराची आणि शिक्षणयंत्रणेची रचना उर्दू माध्यमातून केली. या निजामाच्या पूर्वी संस्थानात उर्दू माध्यम नव्हते. हे संपूर्ण उर्दू माध्यमात रूपांतर करण्याचा कारभार त्याने स्वतः एकोणीसशे पंधरा ते एकोणीसशे वीस एवढ्याच काळात पुरा पाडला.

 हैदराबादचे राज्य व्यवस्थितपणे चालविण्याचे असे हे निजामाचे काम एकीकडे चालू आहे. एकीकडे इत्तेहादुल मुसलमीन संघटना वाढविण्याचा, खाकसारांचे रझाकार करण्याचा, धर्मप्रसार करण्याचा हाही उद्योग चालू आहे. अंजुमान पस्तारख्याम ही संघटना, अस्पृश्यांच्या संघटना हिंदूहून वेगळ्या असाव्या म्हणून काढली आहे, वाढविली आहे. ब्राह्मणेतरांच्या संस्था ब्राह्मणांहून वेगळ्या पड़ाव्या हाही प्रयत्न चालू और आदिवासी वेगळे पडावे म्हणून त्यांचीही एक संस्था काढली आहे. असे है निजामाचे उद्योग चालू होते.

 इकडे भारतीय राजकारणात एकोणीसशे वीस पासून महात्मा गांधींचा उदय झाला आहे. महात्मा गांधी हे भारतीय राजकारणातील एक चमत्कारिक प्रकरण आहे. महाभारताप्रमाणे महात्मा गांधींच्या वाङ्मयातून कोणत्याही भूमिकेला पाठिंबा देणारे वचन आपल्याला उद्धृत करून दाखविता येते. कारण महात्मा गांधींची मते राजकारणाबरोबर क्रमाने विकसित होत गेलेली आहेत. एकोणीसशे अठ्ठेचाळीसचे

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१८९