पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/190

हे पान प्रमाणित केलेले आहे.

गेली आहे; आणि अशी चमत्कारिक विभूती आहे की तिची आदल्या दिवसाची मते आजच्या मतांच्या संपूर्ण विरोधी आहेत.

 म्हणून गांधींचे उतारे देऊन सगळेच भारतीय आंदोलन बदनाम करणे सोपे आहे. गांधी हे वर्णाश्रमधर्माचे पुरस्कर्ते होते असे उतारे एकोणीसशे बावीस साली सापडतील. अनेकजण हे उतारे देऊन गांधी हे वर्णाश्रमाचे पुरस्कर्ते होते असे सांगतही असतात. तीस साली गांधी हे, सर्वच स्मृतिग्रंथ जाळून टाकण्याच्या लायकीचे आहेत या निर्णयावर आले होते. बावीस सालचे गांधी तीस साली शिल्लक नाहीत. ही जी गांधींची परिस्थिती आहे त्याचा परिणाम हैदराबादमधील भिन्न भिन्न मतांच्या मंडळींना गांधींच्या लेखनात आधार मिळण्यात झाला. यातून ज्या मंडळींचे असे मत होते की, हैदराबाद संस्थानात राजकीय चळवळ व्हावयास हवी याला गांधींचा पाठिंबा आहे, अशा मंडळींत केशवराव कोरटकर या नावाचे एक गृहस्थ होते. हे जिल्हा परभणी, तालुका वसमतचे होते. अतिशय उद्योगशील व विलक्षण मते असणारे गृहस्थ. हे फक्त चवथी पास. गृहस्थ स्वतःच्या कर्तृत्वावर वाढत वाढत हायकोर्टाचे वकील झाले. निजामाची मेहरबानी पत्करून त्याच्या मर्जीमधले होऊन बसले. शेवटच्या काळात निजामाच्याच मेहेरबानीने हे हायकोर्ट जज्जसुद्धा झाले. हैदराबादमध्ये पहिले लोकनियुक्त मंत्रिमंडळ बावन्न साली आले. या मंत्रिमंडळातील पहिले अर्थमंत्री विनायकराव विद्यालंकार यांचे केशवराव कोरटकर हे वडील. आणि लोकनियुक्त मंत्रिमंडळाचे पहिले मुख्यमंत्री बी. रामकृष्णराव हे केशवरावांच्या घरी असणारे विद्यार्थी. यांचे सर्व शिक्षण केशवराव कोरटकर यांनी केलेले. हे लक्षात ठेवले तर विनायकराव विद्यालंकारांना आपल्यावरोबर मंत्रिमंडळात घेण्याची घाई बी. रामकृष्णराव यांना का झाली याचा पत्ता आपणास लागेल. हा पत्ता शोधण्याचे कारण विनायकराव विद्यालंकार यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात कधीही भाग घेतलेला नव्हता. याला अपवाद असलाच तर पोलिस कारवाई आधीचे दोन महिने. अधूनमधून इकडची आणि तिकडची म्हणून दोन्हीकडची नातीगोती आपणाला पाहायला पाहिजेत. अशीच तिकडची काही नाती सांगतो. अखिल भारतीय काँग्रेसच्या स्थापनेत पुढाकार घेणाऱ्यांत एक तय्यबजी होते. हे बद्रुद्दिन तैयबजी*


  • बहुधा हे बद्रुद्दिन हसन असावेत. ते काँग्रेस चळवळीत १९२० च्या आसपास होते. पण ते अध्यक्ष नसून कोषाध्यक्ष होते अशी माहिती आढळते. ते खादीसंबंधी व्यवहाराचे प्रमुख होते. पण यासंबंधी अधिक तपास होणे आवश्यक आहे.
    हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१९२