पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/199

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे म्हणून तसे विवाह करणार. वेदात विधवाविवाहाला मान्यता आहे म्हणून तसे विवाह करणार. वेदात अस्पृश्यता नाही म्हणून ती पाळणार नाहीत. वेदात अस्पृश्याच्या मुंजीला विरोध नाही म्हणून तशा मुंजी करणार. असे समाजसुधारणांचे सगळेच कार्यक्रम त्यांनी वेदातून आणले. हे स्वतः उठणार आणि मूर्तीला शिव्या देणार. देवदेवतांना शिव्या देणार. आणि हे उद्योग चालू असतानाच मुसलमानांनी कोणत्याही मूर्तीवर अथवा देवळावर आक्रमण केले की आर्यसमाज हातात काठ्या घेऊन देवळाच्या रक्षणाला सिद्ध होणार. असा हा आर्यसमाज. गांधींना काहीही कळत नाही; निधर्मवाद कळत नाही; अहिंसा कळत नाही. सगळे जे काही आहे ते महर्षी दयानंदांनाच कळते हा यांचा दावा. आणि हे असतानाच गांधींच्या सर्व आज्ञेचे तंतोतंत पालन करण्यात हा समाज सर्वांत पुढे. त्यामुळे आर्यसमाज ही काँग्रेसची एक शाखा असावी तसेच होते. त्यांचे पहिले प्रमुख नेते लाला लजपतराय हे काँग्रेसचे अनुयायी होते. आर्यसमाजाचे तेवढेच प्रमुख नेते स्वामी श्रद्धानंदही काँग्रेसचे अनुयायीच होते. त्या भूमिकेवरून हिंदू-मुसलमान ऐक्याचा प्रचार करीत असतानाच एका माथेफिरू मुसलमानाने त्यांचा खून केला. आर्यसमाजाचे तिसरे प्रमुख नेते चंद्रभानू गुप्ता काँग्रेसमनच होते, आणि ज्यांच्याविषयी सध्या उदंड चर्चा चालू आहे ते गेल्या बारा वर्षांतील अखिल भारतीय आर्यसमाजाचे सर्वांत मोठे नेता चरणसिंग हेही काँग्रेसमनच होते. त्यामुळे आर्यसमाज ही एका अर्थाने काँग्रेसमध्येच असणारी संघटना. आर्यसमाजाने - हैदराबादमधील: स्वतःच्या आंदोलमाला काँग्रेसच्या आंदोलनाच्या काही महिने आधी सुरुवात केली. काँग्रेसने आपले आंदोलन समाप्त केल्यावर एकदोन महिन्यांनी आर्यसमाजाने त्याचे आंदोलनही समाप्त केले. या आंदोलनात भाग घेणाऱ्या सत्याग्रहींचे पुढे काय झाले या दृष्टीने तुम्ही शोध घेऊ लागलात तर तुमच्या असे लक्षात येईल की आर्यसमाजाचे बहुतेक सगळे सत्याग्रही सत्तेचाळीसमध्ये काँग्रेसबरोबरीने लढत आहेत. इथे सेलूचे काय आहे मला माहीत नाही. परभणी जिल्ह्याचे चित्र मला माहीत नाही. पण नांदेड जिल्ह्यामध्ये आर्यसमाजात प्रारंभी कार्य करणारे प्रमुख कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आले. नांदेड शहरातच शामराव बोधनकर, भगवानराव गांजवे, गोपाळरावशास्त्री देव हे तिघेही काँग्रेसमध्ये आले. उमरी बँक प्रकरणातील सर्व माहिती गोळा करणारे उद्यमशील धनजी पुरोहित, पंडित नरेन्द्रजी (आता मुक्काम हैदराबाद) काँग्रेसमध्येच आले. अहमदपूर, निलंगा, उदगीर हे जुन्या बिदर जिल्ह्याचे भाग आहेत. आजच्या

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२०१