पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/210

हे पान प्रमाणित केलेले आहे.






१६.
भांगडिया स्मारक व्याख्यानमाला

व्याख्यान तिसरे :

 हैदराबाद शहरी जे जनतेचे आंदोलन होते त्याच्या वाजू दोन. एक बाजू म्हणजे हैदराबाद संस्थानात असणारी इत्तेहादुल मुसलमीन ही संस्था. या संघटनेचे नेते कासीम रझवी आणि त्यांची भूमिका, आणि या संघटनेकडे असणारे रझाकार या सशस्त्र स्वयंसेवकांचे दल ही एक बाजू झाली. ही बाजू पूर्ण करण्यासाठी आणखी काही बाबी हव्यात. हैदराबाद संस्थानची जी शहाजोग फौज होती तिची संख्या बारा हजार. रझाकारांची जी छुपी फौज होती तीत हे बारा हजार मिसळले की निजामाचे एकूण सैन्य साठ हजारांच्या दरम्यान येते. यातील बारा हजार शास्त्रोक्त शिक्षण झालेले. उरलेले हडेलहप्पी सैनिक. यात पुन्हा संस्थानचे पोलिसदल समाविष्ट नाही. पोलिसाकडे फार मोठी शस्त्रे होती अशातला प्रकार नसला तरी ते हत्यारबंद होतेच. हे हत्यारबंद पोलिस चौदा हजार होते. ही लढ्याच्या आरंभीची व्यवस्था. लढा सुरू झाला तशी रझाकारांची संख्या भराभर वाढत गेली. अठेचाळीसच्या सप्टेंबरपर्यंत ही वाढतच होती. शेवटच्या काळात ती दीड लक्षापर्यंत वाढली होती. यांच्याजवळ तरवारी, कट्यारी, जंबिये, भाले, सुरे, भरावाच्या बंदुका आणि पिस्तुले अशी हत्यारे होती. तरीही यांच्याजवळ मशिनगन, स्टेनगन, ब्रेनगन अशी हत्यारे नव्हती हेही ध्यानात असावे. पण जी हत्यारे होती ती सर्व संस्थानभर अत्याचार करणे आणि भीतीचे वातावरण तयार करणे या कामाला पुरून उरणार होती. अत्याचार करण्यासाठी

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२१२