पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/218

हे पान प्रमाणित केलेले आहे.

असे मुन्शींचे वर्णन आहे. यापैकी नेमके काय घडले? मी तिथे हजर नव्हतो. मुनशीही हजर नव्हते. माझी माहिती ऐकीव तशीच त्यांचीही ऐकीव. फक्त फरक एवढाच की आमची माहिती स्वामीजींच्याकडून आलेली आहे. आमचा विश्वास स्वामीजींवर आहे. ज्यांचा कन्हैयालाल मुन्शींवर विश्वास असेल त्यांनी तो ठेवायला आमची हरकत नाही.

 या सर्व आंदोलनात रझाकारांनी केलेल्या अत्याचारी घटनांची जशी मालिका आहे तसेच आमच्याकडूनही सशस्त्र आंदोलक लढत होते. आमच्या मंडळींनी ठाण्यावर हल्ले केलेले आहे. ठाणी लुटलेली आहेत. सगळ्या तऱ्हेच्या हकिकती आहेत. या हकिकतीसुद्धा मी मोठ्या प्रमाणात सांगू शकेन. पण त्या मी सांगणार नाही. त्यातील एकच हकीकत मी थोडक्यात सांगतो. कारण तिच्याविषयी अनेकांच्या मनात गैरसमज आहेत. मी सांगणार आहे ती घटना उमरी बँकेच्या लुटीची आहे. उमरी बँकेची लूट तीही या लक्ष्यातील एक अशीच लोकविलक्षण घटना आहे. संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्याच्या या जवळजवळ शंभर वर्षांच्या आंदोलनात या घटनेला समांतर दुसरी घटना नाही. ज्या ठिकाणी भारतीय स्वयंसेवकांनी ठाणे अथवा बँक लुटण्याचा प्रयत्न केला त्यातले बहुतेक सगळे प्रयत्न अयशस्वी झाले. कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांना बँकेतला पैसा बाहेर काढावयास अपयश आलेले आहे. चार दोन ठिकाणी हा पैसा ताब्यात घेण्यात त्यांना यश मिळाले. हा ताब्यात आलेला पैसा कधीही सुरक्षित जागी जाऊन पोहोचला नाही. त्याचे काय झाले याचा हिशोब पुढच्या काळात लागलेला नाही. उमरी बँक लूट ही मात्र एक वेगळीच अशी घटना आहे.

 आखणीच्या दृष्टीने या लुटीची तयारी दीड वर्ष चाललेली होती. धनजी पुरोहित हे गृहस्थ उमरी बँक लुटण्याच्या कल्पनेचे नीट प्रवर्तक. त्यांच्या सर्व आयुष्याची धुळधाण या लढ्यामध्ये झाली. आठ-दहा लाखांचे स्वतःचे उत्पन्न असणारा हा मारवाडी व्यापारी. त्यांनी महिनोगणती हिशोब ठेवून उमरी बँकेची माहिती जमा केली. बँकेच्या सर्व मॅनेजरांना आपल्या घरी चहापाण्याला नेहमी बोलावून, त्यांच्याशी स्नेहाच्या गप्पा करून पुरोहितांनी सारी गणिते मांडली. कोणत्या काळात उमरी बँकेत जास्तीत जास्त पैसा असतो आणि एका वेळेला रोख रक्कम किती असू शकते, कोणत्या वेळेला ती लुटणे फायद्याचे ठरेल हे सर्व नक्की केले. हे धनजी पुरोहित बँक लुटल्याच्या नंतर लूट घेऊन जाणाऱ्या मंडळींच्या बरोबरच स्वतःचे घरदार सोडून उमरखेडपर्यंत आले.

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२२०